मला आमदार करा, मानधन फक्त १ रुपया द्या, बाकी...; शेतकरी पुत्राचं राज्यपालांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 01:07 PM2023-01-10T13:07:50+5:302023-01-10T13:08:32+5:30
वास्तविक पाहता १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपाल अडचणीत असताना हे प्रकरण न्यायालयातही गेले.
बीड - राज्यातील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न अद्यापही रेंगाळलेला आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही. त्यात आता बीडमधील एका शेतकरी पुत्राने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मला आमदार करा असं मागणी करणारे पत्र पाठवले आहे. त्यामुळे या पत्राला राज्यपाल काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे.
श्रीकांत गदळे हे स्वतः शेतकरी असून केज तालुक्यातील दहिफळ गावचे रहिवासी आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी राज्यपाल कोट्यातून आमदार करावं अशी मागणी गदळे यांनी राज्यपालांकडे केली आहे. विशेष म्हणजे या पदावर नियुक्ती केल्यास मिळणाऱ्या मानधनातून केवळ एक रुपया प्रति महिना स्वतःसाठी घेईल आणि उर्वरित रक्कम राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी खर्च करेल असा लेखी बॉंडच गदळे यांनी दिला आहे.
वास्तविक पाहता १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपाल अडचणीत असताना हे प्रकरण न्यायालयातही गेले. १२ आमदारांची नियुक्ती मागील दोन वर्षांपासून रखडली आहे. त्यातच आता गदळे यांनी ही मागणी केल्याने एकच चर्चा होत आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात १२ जणांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे पाठवली होती. परंतु ही नावे राज्यपालांनी मंजूर केली नाहीत. त्यानंतर मविआ सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले. त्यामुळे आता ही १२ नावे बदलण्यात येणार असल्याचंही बोलले जात आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधक यांच्या कुरघोडीच्या राजकारणात विधान परिषदेतील १२ जागा अद्यापही रिक्त आहेत.
याबाबत श्रीकांत गदळे म्हणतात की, राज्यात ३-४ वर्ष उलटली तरी राज्यपाल नियुक्त १२ जागा आजही रखडल्या आहेत. या १२ जागा सामाजिक, कला आणि क्रिडा या क्षेत्रातून येत असतात. या विभागाचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आमदार कटिबद्ध असतात. ज्यापद्धतीने या जागा प्रलंबित आहेत. त्यातील १२ जागांपैकी एका जागेवर मला संधी द्यावी. मी अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याची संधी राज्यपालांनी मला द्यावी. जर ही नियुक्ती केली तर मिळणारे मानधन केवळ १ रुपया घेईन आणि उर्वरित पैसे राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी वापरेन अशी ग्वाही देतो असं त्यांनी बॉन्डवर लिहून दिले आहे.