मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत खेटे; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 06:21 AM2024-08-11T06:21:07+5:302024-08-11T06:21:23+5:30
ठाकरे यांची ठाण्याकडे पाठ फिरत नाही तोच उद्धवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अनिता बिर्जे यांचा शिंदेसेनेत प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पूर्वी दिल्लीतले नेते मातोश्रीवर येत होते. मात्र, आता मातोश्रीच मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत खेटे घालत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार अशी ओरड करत आहेत. मात्र, आता महायुती सरकार स्थापन होऊन दोन वर्षे झाली अद्याप सरकार टिकून आहे. कारण आम्ही बाळासाहेब आणि दिघे यांचे विचार सोडलेले नाहीत.
राज ठाकरे यांच्यावर सुरुवातीला सुपाऱ्या फेकल्या. ॲक्शनला रिॲक्शनही येतेच. परंतु ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही शिंदे म्हणाले. मनसैनिकांच्या कृतीचे समर्थन होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले; परंतु ज्यांनी हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.
ठाकरे यांची ठाण्याकडे पाठ फिरत नाही तोच उद्धवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे शनिवारी रात्री शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.