नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, उद्धव ठाकरेंचा घणाघाती टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 07:44 AM2018-02-17T07:44:27+5:302018-02-17T07:45:10+5:30

कर्जाचा हप्ता फेडता न आल्याने कर्जात डुबून शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट करणारे दरोडेखोर सरकारी कृपेने सुखरूप आहेत

Make Neerav Modi the governor of the Reserve Bank- Uddhav Thackeray | नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, उद्धव ठाकरेंचा घणाघाती टोला

नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, उद्धव ठाकरेंचा घणाघाती टोला

Next

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेतील ११,३00 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कर्जाचा हप्ता फेडता न आल्याने कर्जात डुबून शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट करणारे दरोडेखोर सरकारी कृपेने सुखरूप आहेत, अशा शब्दात सामना संपादकीयमधून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. शे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या घरादारावर जप्तीचा नांगर फिरतो, पण देशातील बनेल उद्योगपतींनी राष्ट्रीयीकृत बँकांची दीड लाख कोटींची लूट केली व ते सगळे दरोडेखोर सरकारीकृपेने ‘सुखरूप’ आहेत. देश सध्या जाहिरातबाजीवर चालला आहे. प्रसिद्धी व जाहिरातबाजीवर हजारो कोटी खर्च सुरू आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुरामन राजन यांनी समोर आणल्या तेव्हा त्यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर नीरव मोदीलाच बसवा, म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल!, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

सामना संपादकीयमध्ये म्हंटलं आहे की, हिंदुस्थानात विकासकामांसाठी पैशाची कमतरता नाही; पण बादलीलाच जर छिद्र असेल तर पाणी भरणार कसे, असा सवाल पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेस ११ हजार कोटींचा चुना लावला. चुना लावून हे महाशय सहकुटुंब पळून गेले. नीरव मोदी याने जानेवारीतच देश सोडल्याचे उघड झाले, पण गेल्याच आठवड्य़ात हे महाशय पंतप्रधान मोदींबरोबर ‘दावोस’ येथे मिरवत होते व मोदी यांच्यासोबतची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. नीरव मोदी हा भारतीय जनता पक्षाचा ‘हमसफर’ होता व निवडणुकांसाठी पैसा जमा करण्यात हे महाशय आघाडीवर होते. अर्थात इतका मोठा घोटाळा नीरवने भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने केला व त्याने बँकांची जी लूट केली त्यातला वाटा भाजपच्या खजिन्यात गेला असा आरोप आम्ही करणार नाही! पण भाजपची श्रीमंती वाढवण्यात व निवडणुका जिंकण्यासाठी वगैरे पैशांचे डोंगर उभे करण्यात असे अनेक नीरव मोदी झटत आहेत. हा पैसा शेवटी राष्ट्राच्या तिजोरीवर डल्ला मारूनच उभा केला जातो हे नीरव मोदी प्रकरणात उघड झाले. 

न खाऊंगा न खाने दूंगा’ ही पंतप्रधान मोदी यांची घोषणा येथे अपयशी ठरली आहे. पंजाब नॅशनल बँकेत नीरवभाईने घोटाळा केल्याची तक्रार आधीच दाखल झाली होती तरीही हा माणूस दावोसला कसा गेला, दावोस येथे पंतप्रधान मोदी यांना जे उद्योगपती भेटले त्यात तो कसा सहभागी झाला हे आधी सांगा. नीरव मोदीचे आधार कार्ड बँक खात्यास ‘लिंक’ केले असते तर काही गोष्टी उघड झाल्या असत्या. सामान्य माणसाला ‘आधार कार्डा’शिवाय स्मशानात लाकडेही मिळत नाहीत व इस्पितळात प्रवेश मिळत नाही, पण नीरव मोदीने ‘आधार कार्डा’शिवाय अकरा हजार कोटींची लूट बँकांतून केली. नीरव सहिसलामत पळून गेल्यावर देशातील तपास यंत्रणा ‘ईडी’ वगैरेंनी त्याच्या मालमत्तांवर धाडी घातल्या. गुरुवारी १८ ठिकाणी धाडी घालून ५१०० कोटी रुपयांचे हिरे व दागिने जप्त केले असे वाचनात आले. अशा मालमत्ता विजय मल्ल्या व ललित मोदीच्यादेखील आहेत, पण तेसुद्धा पसार झाले. अशाच प्रकारच्या खऱ्याखोट्य़ा गुन्ह्य़ांसाठी राजकारणी तुरुंगात जातात. 

मुंबईत भुजबळ व पाटण्यात लालू यादव तुरुंगात आहेत, पण नीरव मोदीप्रमाणे कृपाशंकर यांचे भाग्य चमकल्याने भाजपकृपेने ते ‘सुखरूप’ सुटले आहेत. पुण्याचे ‘डी.एस.के.’ यांचाही पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, पण सरकारच्या नाकासमोरून मल्ल्या व नीरव मोदी पळून गेले आहेत. २०१४ साली निवडणुका जिंकून देण्यात ‘भाजप’च्या मागे जे धनदांडगे उभे राहिले ते काय लायकीचे होते हे आता दिसले. भ्रष्टाचारमुक्त देश व पारदर्शक कारभाराची लक्तरे फक्त तीन वर्षांत निघाली. 

Web Title: Make Neerav Modi the governor of the Reserve Bank- Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.