मडगाव स्फोटाची नव्याने चौकशी करा
By admin | Published: June 22, 2016 04:14 AM2016-06-22T04:14:41+5:302016-06-22T04:14:41+5:30
मडगाव स्फोटाची नव्याने चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी दाभोलकर कुटुंबीय पुढील आठवड्यात गोवा उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. २००९ च्या या स्फोटात वीरेंद्र सिंग तावडे
डिप्पी वांकाणी, मुंंबई
मडगाव स्फोटाची नव्याने चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी दाभोलकर कुटुंबीय पुढील आठवड्यात गोवा उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. २००९ च्या या स्फोटात वीरेंद्र सिंग तावडे याचा सहभाग असल्याची माहिती सीबीआयच्या तपासात पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि गोवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला तेव्हा वीरेंद्र सिंग तावडे याचे नाव समोर आले नव्हते. नरेंद्र दाभोलकरांचे चिरंजीव हमीद दाभोलकर याबाबत बोलताना म्हणाले की, या प्रकरणाचा केवळ पुनर्तपास नव्हे, तर उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली जलदगतीने याचा तपास व्हावा, यासाठी आम्ही पुढील आठवड्यात एक याचिका दाखल करणार आहोत. दरम्यान, सूत्रांनी सांगितले की, तावडेला २००९ च्या मडगाव स्फोटात अटक झाली असती, तर त्यानंतर कदाचित या तीन बुद्धिवाद्यांच्या हत्या झाल्याच नसत्या.
सीबीआयने दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणात तावडेला अटक केलेली आहे. सारंग अकोलकर, रुद्र पाटील, प्रकाशअण्णा पाटील, प्रवीण निमकर, विनय पवार या पाच आरोपींच्या संपर्कात तावडे होता, असे तपासात पुढे आले आहे. कट रचण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे.
हमीद म्हणाले, हत्येत सहभागी असलेल्या सारंग अकोलकर आणि अन्य आरोपींच्या छायाचित्रांसह एक राज्यव्यापी अभियान सुरू केले आहे. ज्या माध्यमातून या आरोपींबाबत माहिती असलेले नागरिक समोर येतील. १६ आॅक्टोबर २००९ रोजी झालेल्या मडगाव स्फोटप्रकरणी गोवा पोलिसांनी सनातन संस्थेच्या सहा सदस्यांना अटक केली होती.