सिंधुदुर्ग विकासाच्या बाबतीत एक नंबर बनावा - दीपक केसरकर
By admin | Published: October 7, 2016 05:04 PM2016-10-07T17:04:51+5:302016-10-07T17:04:51+5:30
कोणीही कितीही टिका केली तरी त्याला शब्दांच्या माध्यमातून नव्हे तर कृतीतूनच उत्तर द्यायला पाहिजे,असे मी मानतो. दिव्यांग व्यक्तिना साहित्य वाटप करून नुसते
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि.07 - कोणीही कितीही टिका केली तरी त्याला शब्दांच्या माध्यमातून नव्हे तर कृतीतूनच उत्तर द्यायला पाहिजे,असे मी मानतो. दिव्यांग व्यक्तिना साहित्य वाटप करून नुसते न थांबता त्यांच्यासाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले पाहिजेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. असे सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्हा फक्त स्वच्छतेच्या बाबतीतच नव्हे तर विकासाच्या बाबतीतही एक नंबर बनावा यासाठी सर्वानी एकत्रितपणे प्रयत्न करुया,असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी येथे केले.
भारत सरकार सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने येथील भगवती मंगल कार्यालयात शुक्रवारी दिव्यांग व्यक्तिना साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, भाजप प्रवक्ते माधव भंडारी, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हापरीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे,उपसभापती महेश गुरव, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, योगेश साळे, डॉ.श्रीधर जाधव, डॉ.चोपडे, रविंद्र शेट्ये,राजन चिके, राजू शेट्ये, सचिन सावंत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले, मी टिकेला कधीच उत्तर देत नाही. कारण त्यात शक्ति वाया घालविण्यात अर्थ नसतो. विकासकामांसाठी किती जरी निधी आणला तरी त्याचा विनियोग चांगल्या प्रकारे होणे महत्वाचे आहे. त्यासाठी प्रशासन व अधिकाऱ्यांना कामाला लावणे गरजेचे असते. खासदार विनायक राऊत हे जिल्ह्याला मिळालेले वरदान आहे. त्यांच्या प्रयत्नातून दिव्यांग लोकांसाठी ही केंद्र शासनाची योजना सिंधुदुर्गात राबविली जात आहे.
दिव्यांग व्यक्तींची एक शक्ति देवाने काढून दिली तरी त्यांना गुण तसेच कौशल्याच्या रूपाने दूसरी शक्ति दिलेली असते. त्यामुळे मानसिक बळ कमी होऊ न देता या व्यक्तिनी जीवन जगणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील डॉक्टरना चांगली वागणूक दिली पाहिजे. बाहेरून आपल्या जिल्ह्यात आलेल्या डॉक्टरांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच
चांगले वातावरण निर्माण करण्याची लोकप्रतिनिधी तसेच जनतेचीही जबाबदारी आहे. असे झाले तरच येथे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकेल. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस यंत्रणा तसेच ह्रदय रोगावरील अद्ययावत उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आपले प्रयत्न आहेत. मे महिन्यापर्यंत या सुविधा उपलब्ध केल्या जातील. असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्र तसेच राज्य शासनाची प्रत्येक योजना प्रभाविपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढच्या टप्प्यात 2500 दिव्यांग व्यक्तिना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेने विकासाच्या बाबतीत चांगले काम केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा सन्मान केला आहे. वागदे येथील महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न वैभव नाईक यांनी उचलून धरला होता. त्यामुळे शासनाने 60 ऐवजी 45 मीटर महामार्ग रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्गातील जमिनंमालकाना सर्वात जास्त मोबदला शासन देणार आहे. त्यामुळे यापुढेही पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासातही सिंधुदुर्ग जिल्हा एक नंबर करण्याचा आपण प्रयत्न करुया.
माधव भंडारी म्हणाले, दिव्यांग व्यक्तिना स्वतःच्या पायावर उभे करतानाच त्यांना प्रशासनाने कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे. या कामात लोकप्रतिनिधिहि सहकार्य करतील. सिंधुदुर्गची जबाबदारी आता वाढली असून स्वच्छतेच्या बाबतीत सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
वैभव नाईक म्हणाले, अपंगाना शासकीय नोकरित आरक्षण आहे. या आरक्षणाची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी .यासाठी आमचे प्रयत्न रहातील. शासनाच्या योजना जनतेपर्यंत अनेकवेळा पोहचत नाहीत. मात्र, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित काम केले तर योजना यशस्वी होतात.याचे आजचा कार्यक्रम हे उत्तम उदाहरण आहे.
प्रास्ताविक डॉ.योगेश साळे तर सूत्रसंचालन सूर्यकांत वारंग यांनी केले. आस्था सर्पे, शेखर सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले.(प्रतिनिधी)
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे 14 रोजी अनावरण !
गृहराज्यमंत्री या नात्याने येथील जनतेला सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी माझे प्रयत्न आहेत. मालवण,वेंगुर्ले,सावंतवाड़ी अशा प्रमुख शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून त्यांचे अनावरण 14 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. गावात दारू भट्टी सुरु असेल तर ग्रामस्थानी फक्त एक फोन पोलिस स्थानकात करावा ,तत्काळ कारवाई करण्यात येईल. युवतींची छेड काढणाऱ्यांसाठीही कड़क धोरण ठरविण्यात आले असल्याचे यावेळी मंत्री केसरकर यांनी सांगितले.
दाखल्याची प्रक्रिया सुलभ करणार !
दिव्यांग व्यक्तिना शासनाकडून सुविधा मिळण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून देण्यात येणाऱ्या दाखल्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल.तसेच एकही दिव्यांग व्यक्ति या सुविधापासून वंचित रहाणार नाही यासाठी आमचे प्रयत्न रहातील. असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी यावेळी सांगितले.