गोवंशाचे फोटोसेशन करा!
By admin | Published: April 2, 2015 04:48 AM2015-04-02T04:48:44+5:302015-04-02T04:48:44+5:30
गोवंश हत्याबंदी प्रकरणी मालेगावात राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोेलिसांनी त्याचा वेगळाच धसका घेतला असून मालकांनी त्यांच्या
नाशिक : गोवंश हत्याबंदी प्रकरणी मालेगावात राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोेलिसांनी त्याचा वेगळाच धसका घेतला असून मालकांनी त्यांच्या गोवंशाचे थेट फोटोसेशनच करण्याचे अजब आदेश दिले आहेत.
गोवंश पालकांनी त्यांच्या जनावरांची माहिती छायाचित्रासह संबंधित पोलीस ठाण्यात हमीपत्रासह जमा करावी, असा अजब आदेश पोलिसांनी काढला आहे. त्यावर गोवंश पालकांत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
गोवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत गेल्या आठवड्यात शहरात राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला. त्यामुळे शहरातील गोवंश खरेदी - विक्रीच्या व्यवहारावर देखरेख ठेवण्यासाठी पोलिसांनी एका समितीही नेमली आहे. त्यात स्थानिक पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे. स्थानिक पोलिसांनी गोवंशाची छायाचित्रांच्या आधारे नोंद करण्याचे निश्चित केले आहे. त्यात गोवंश पालकांनी त्यांच्या जनावराच्या छायाचित्रासोबत संबंधित जनावराची खरेदी कोठून व कधी केली? जनावराचे वय किती?, ते कशासाठी बाळगले आहे?, विकावयाचे असल्यास कोणाला व कशासाठी विकणार आहे? या प्रश्नांची उत्तरे मालकाला हमीपत्रासह लिहून द्यावयाची आहेत. (प्रतिनिधी)