वीज सवलतीबाबत सकारात्मक निर्णय घेणार
By Admin | Published: December 3, 2015 03:40 AM2015-12-03T03:40:18+5:302015-12-03T03:40:18+5:30
वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी राज्यातील उच्चदाब यंत्रमागांना वीजदरातील सवलत यापुढेही चालू ठेवण्यासाठी, शासन सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई : वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी राज्यातील उच्चदाब यंत्रमागांना वीजदरातील सवलत यापुढेही चालू ठेवण्यासाठी, शासन सकारात्मक विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील उच्चदाब यंत्रमागधारकांना सुरू असलेली वीजदरातील सवलत कायम ठेवण्याची मागणी फेडरेशन आॅफ आॅल इंडिया टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (ऋअकळटअ) शिष्टमंडळाने बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव प्रवीण दराडे, असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप होगाडे आदींसह वस्त्रोद्योग विभागातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्य शासनाने वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी पुढाकार घेतला असून, कापूस उत्पादक क्षेत्रात कापड गिरण्या सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या उद्योगाच्या वाढीसाठी शासनाने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे मेगा टेक्स्टाईल हब स्थापन केले असून तेथे मोठे उद्योग येण्यासाठी या उद्योगांना पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये टेक्स्टाईल पार्क सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.’ (प्रतिनिधी)
शिष्टमंडळाची विनंती
राज्यात ३५० पेक्षा अधिक उच्चदाब यंत्रमाग असून, आधुनिक यंत्रमागांची संख्या ७० हजारांच्या आसपास आहे.
या उद्योगांना वीजदराची सवलत चालू राहिल्यास, त्याचा फायदा राज्यातील उद्योगांना होऊन, या उद्योगांच्या माध्यमातून कामगारांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देता येतील, असेही शिष्टमंडळाने यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले.