दर्जेदार दूध पुरवठा करा
By Admin | Published: December 14, 2015 12:02 AM2015-12-14T00:02:42+5:302015-12-14T00:02:42+5:30
जिल्हा दूध संघाने दर्जेदार दुधाचा पुरवठा करून बाजारपेठ काबीज करावी. संघाला मिळालेल्या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी व्हावा, दूधभेसळीला मूठमाती द्यावी
पुणे : जिल्हा दूध संघाने दर्जेदार दुधाचा पुरवठा करून बाजारपेठ काबीज करावी. संघाला मिळालेल्या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी व्हावा, दूधभेसळीला मूठमाती द्यावी, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्हा दूध सहकारी संघ कात्रजच्य वतीने शरद पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कात्रज डेअरी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या जीवनावरील कार्याचा आढावा घेणारे चित्रप्रदर्शन, दुधाळ जनावरांचे प्रदर्शन, दोन हजार टन क्षमतेच्या दूध शीतगृहाचे उद्घाटन, कात्रज दुग्धालयास आयएसओ प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम, दुग्धव्यावसाय व पशुसंवर्धन या विषयावर विविध मान्यवरांची चर्चासत्रे आदींचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पवार बोलत होते. माजी विधानभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महापौर दत्तात्रय धनकवडे , जालिंदर कामठे, दिलीप मोहिते आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘शरद पवार यांनी राज्याच्या सर्व क्षेत्राचा विकास झाला पाहिजे अशी भूमिका कायमच घेतली. दुग्धव्यवसायाच्या वाढीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. राज्यात दुष्काळ पडला होता त्या वेळी चारा छावण्यांची व्यवस्था केली. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय करीत आहे.’’
कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेतला. उपाध्यक्ष वैशाली गोपाळघरे यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)
शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच काम केले. वैयक्तिक लक्ष दिले. ते विरोधी पक्षनेते असताना एका सातारच्या कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. रूपाली- वैशाली या टोमॅटोच्या जाती चांगल्या आहेत. मात्र, त्यांचे बियाणे महाराष्ट्रात मिळत नाही, असे सांगितले. त्यांनी बंगळुरूच्या दौऱ्यात या शेतकऱ्यासाठी बियाणाची पाकिटे आणली.
- दिलीप वळसे- पाटील