अफवा पसरविणाऱ्यांवर करा कारवाई !
By admin | Published: June 25, 2015 01:53 AM2015-06-25T01:53:43+5:302015-06-25T01:53:43+5:30
मुंबईत चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, या आशयाचे संदेश व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवून अकारण जनतेमध्ये घबराटीचे वातावरण
मुंबई : मुंबईत चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, या आशयाचे संदेश व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पसरवून अकारण जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत संदेश उगमकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती महापालिका प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे. अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख
यांनी सहपोलीस आयुक्त देवेन
भारती यांच्याकडे लेखी पत्राद्वारे ही विनंती केली आहे.
२० जून रोजी मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार वृष्टी होऊन सखल भागांमध्ये पाणी साचणे, घरे आणि झाडे कोसळणे इत्यादी बाबींचा सामना मुंबईकरांना करावा लागला.
कुलाबा वेधशाळेने पुढील दोन दिवस मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये साशंकतेचे वातावरण असतानाच अनाहूत व्यक्तीने संदेश तयार करुन व्हॉटसअॅपवर पसरवला. अरबी समुद्र्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊन मुंबईत पुन्हा एकदा चक्रीवादळासारखी/२६ जुलै, २००५ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, या आशयाचा हा संदेश मुख्यत्वे व्हॉट्स अॅपद्वारे पसरविण्यात आला. हा संदेश मोठ्या प्रमाणावर पसरून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
हा संदेश पसरविणाऱ्या संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध अत्यंत कडक कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती देशमुख यांनी केली आहे.