शिक्षणात संस्कृत अनिवार्य करा - स्वरूपानंद सरस्वती
By admin | Published: September 17, 2015 01:51 AM2015-09-17T01:51:21+5:302015-09-17T01:51:21+5:30
प्राथमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृत भाषा अनिवार्य करावी, तिचा पाठ्यक्रमात समावेश करावा. त्याचबरोबर वैदिक शिक्षणदेखील सुरू करावे, असे प्रतिपादन
त्र्यंबकेश्वर : प्राथमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृत भाषा अनिवार्य करावी, तिचा पाठ्यक्रमात समावेश करावा. त्याचबरोबर वैदिक शिक्षणदेखील सुरू करावे, असे प्रतिपादन ज्योतिषपीठावर तथा द्वारका शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे भारत साधू समाजाच्या कुंभ महाअधिवेशनात केले.
आखाड्यांचे संत-महंत अधिवेशनाला उपस्थित होते. स्वरूपानंद म्हणाले, गोदावरीत सिंहस्थ स्नान करून पवित्र व्हाल आणि त्यानंतर शिर्डीच्या साई मंदिरात जाऊन अपवित्र होणार हे योग्य आहे काय? देवदेवतांच्या मंदिरातील साईच्या मूर्ती, प्रतिमा हटवाव्या, संसदेत राममंदिर बांधण्याचा कायदा करावा, देशभर गोवंश हत्याबंदीचा कायदा करावा, धर्म परिवर्तन होऊ नये म्हणून साधूंनीच पुढाकार घ्यावा यासह १३ प्रस्ताव अधिवेशनात मंजूर झाले.
मठ-आश्रम-मंदिरांच्या देणग्यांवर होणारी कर आकारणी रद्द करावी. सरकार धर्मनिरपेक्ष असू शकते पण व्यक्ती निरपेक्ष असूच शकत नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. शाळा, विद्यालय, महाविद्यालयातून रामायण, महाभारत, भगवद्गीता शिकवावी असे आवाहनही स्वरूपानंद यांनी केले. (प्रतिनिधी)