रुग्णांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करा
By admin | Published: April 21, 2015 01:07 AM2015-04-21T01:07:30+5:302015-04-21T01:07:30+5:30
जिल्ह्यातील शेकडो रुग्ण आपण बरे होऊ या आशेने वैद्यकीय महाविद्यालयात येतात. डॉक्टरांनीही त्यांच्यावर योग्य उपचार करून आपुलकीची भावना
यवतमाळ : जिल्ह्यातील शेकडो रुग्ण आपण बरे होऊ या आशेने वैद्यकीय महाविद्यालयात येतात. डॉक्टरांनीही त्यांच्यावर योग्य उपचार करून आपुलकीची भावना निर्माण केल्यास त्यांच्या मनात शासकीय रुग्णालयाबाबत विश्वास निर्माण होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी सोमवारी केले.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात अभ्यागत मंडळाची बैठक सोमवारी झाली. या वेळी पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड उपस्थित होते.
रुग्णालयातील सोयी-सुविधा, औषधी, उपकरणे, वीजपुरवठा, परत जाणारा निधी, अस्वच्छता, यंत्रणेची अनुपस्थिती अशा विविध मुद्द्यांवर ही बैठक गाजली. या वेळी विजय दर्डा म्हणाले, की वसंतराव नाईकांच्या नावाने हे महाविद्यालय चालविले जाते. त्यामुळे या नावाचा योग्य सन्मान राखला पाहिजे. व्हीआयपी आणि सामान्यांना सारखीच ट्रीटमेंट द्या़ महाविद्यालयातून रुग्ण समाधानी होऊन घरी जाणे गरजेचे आहे. रुग्णांना येथेच औषधी व उपचार उपलब्ध झाले पाहिजे. त्यांच्यावर औषधीसाठी बाहेर जाण्याची वेळ येऊ नये. शासनस्तरावर दर करार न झाल्याने औषधी खरेदीत अडचण येत असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविद्यालयात स्वतंत्र उपकेंद्र उभारूनही सलग वीज मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उघड झाला. वीज कंपनीचे अधिकारी त्यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. बैठकीला गैरहजर असलेल्या वीज अधीक्षक अभियंत्याला जाब विचारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)