जीवनात आनंद टिकून ठेवण्यासाठी या 'पाच' गोष्टी नक्की करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2016 08:24 PM2016-07-14T20:24:58+5:302016-07-14T20:31:56+5:30
आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीत समाधानी राहणं हाच खरा आयुष्याचा मूलमंत्र आहे.
ऑनलाइन लोकमत,
मुंबई, दि. 14 - आयुष्यात समाधानी राहणं खूप महत्त्वाचं असतं. कोणत्याही गोष्टीत समाधानी राहणं हाच खरा आयुष्याचा मूलमंत्र आहे. आजूबाजूला घडणा-या अनेक गोष्टींमुळे आपण चिंताक्रांत होतो. विनाकारण काळजी करत राहतो. त्याचाच परिणाम ब-याचदा आपल्या कामावर होतो. त्यामुळे स्वतःमध्ये एक प्रकारची नकारात्मकता येते. त्यामुळे आयुष्यात कोणत्या गोष्टींचा अंगीकार करायला पाहिजे, याची माहिती पुढीलप्रमाणे-
1. कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट असा लगेच निष्कर्ष काढू नका
एखादी गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे, हे आपण त्या प्रसंगावरून लगेच ठरवून टाकतो आणि मग त्याच्यातच गुरफटून पडतो. त्यामुळे चांगला आणि वाईट हे शब्द मनात आणू नका. कोणतीही टोकाची भूमिका उचलण्याआधी एकदा विचार करा.
2. आयुष्यात परिवर्तन महत्त्वाचे आहे
जगात कुठली गोष्ट वेळेनुरूप कायम येत असले ती म्हणजे परिवर्तन. तुम्ही जर दुःखात असाल, तर कालांतरानं दुःख दूर होईल आणि जीवनात पुन्हा आनंद येईल. त्यानुसारच आनंदावर काही काळापुरते दुःखाचं सावट असतंच. आयुष्यात परिवर्तन ही एकमेव स्थिर गोष्ट आहे. परिवर्तित होणारच हे स्वीकारलं तर पुढे जाणे कठीण नाही.
3. कुठल्याच गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा अट्टहास नको
आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत. हे खरं असलं तरी आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीवर आपल्याला नियंत्रण ठेवता येईलच, असं नाही. त्यामुळे काही गोष्टी मनाविरुद्ध घडणं साहजिक आहे. मात्र त्यातही समाधानी राहण्यास शिकल्यास आनंद टिकून राहील.
4. इतरांची बोलणी ऐकणं सहन करा
आपण इतरांशी कसे वागावे, हे आपल्या हातात आहे. मात्र इतरांच्या वागणुकीवर आपलं नियंत्रण ठेवू शकत नाही. संतापाच्या भरात एखादा आपल्याला अपशब्द बोलू शकतो, मात्र त्या वागणुकीचा मनस्ताप करून घेण्यापेक्षा समोरच्याला क्षमा करा आणि विसरून जा, हा मंत्र आयुष्यात जपलात तर आपल्याला होणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल.
5. भावनांतून शिकण्याला प्राधान्य द्या
प्रत्येक भावनेचा स्वीकार करणं महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे चांगल्या भावनांना आपण स्वीकारतो, त्याप्रमाणे दुःख, निराशा यांचाही सन्मान करायला शिका. वाईट वाटण्यात काहीच गैर नाही. प्रत्येक भावना एकदा जरूर अनुभवायला हवी. त्यातूनच तुम्ही शिकाल आणि कणखर व्हाल.