लष्करी उपायांसह ‘अखंड भारत’ करा

By Admin | Published: July 14, 2017 01:24 AM2017-07-14T01:24:59+5:302017-07-14T01:24:59+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी

Make 'unbroken India' with military measures | लष्करी उपायांसह ‘अखंड भारत’ करा

लष्करी उपायांसह ‘अखंड भारत’ करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शांततेसह सहअस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि भारत हाच जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सर्व लष्करी उपाय योजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी, असा ठराव आज पुण्यातील मुस्लिम समुदायाच्या संघटना, मौलवी, इमाम आणि मशिदीतील मुतवल्ली यांच्या बैठकीत करण्यात आला.
बैठकीत संमत केलेला ठराव :
पवित्र अमरनाथ
यात्रेतील यात्रेकरूंवर झालेल्या अमानुष गोळीबारात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अवामी महाज या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मौलाना निजामुद्दीन (मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मेंबर), मौलाना अय्युब अश्रफी (अध्यक्ष, पुणे जिल्हा सुन्नी जमात), मुफ्ती अहमद हसन (आॅल इंडिया इमाम्स कौन्सिल), अनीस चिश्ती, (ज्येष्ठ अभ्यासक), डॉ. पी. ए. इनामदार (अध्यक्ष, अवामी महाज), एस.बी.एच. इनामदार, शेख चाँद सरदार, वाहिद बियाबानी (सचिव, अवामी महाज), लतीफ मगदूम (सचिव, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी), इक्बाल मुलाणी, शफी हसन काझमी, शेख शाहिद मुनीर, अब्दुल वहाब शेख हे मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते. गुरुवारी सकाळी आझम कॅम्पस येथे ही बैठक झाली. धार्मिक कट्टरतावादाचा निषेध आहेच; पण कोणीही त्याचा राजकारणासाठी उपयोग करू नये, असे अनीस चिश्ती म्हणाले.

>बैठकीत संमत केलेला ठराव
भारताच्या सर्व सीमांवर शांतता निर्माण झाल्याशिवाय आम्हा सर्व भारतीयांची चौफेर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होणार नाही याची जाणीव ठेवून आहोत. भारताच्या सीमा शांततामय न राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लष्कर, लष्करी सामग्री व इतर बाबींवर गेली सत्तर वर्षे प्रचंड प्रमाणात खर्च करत आहोत. सदर खर्च वाढत असल्याने अनेक प्रगतीच्या योजना अमलात आणू शकलो नाही.
या करिता ब्रिटिशांनी पूर्वनियोजित कालानुसार भारताची फाळणी केली ही अनैसर्गिक होती व आहे, करिता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नम्र विनंती करत आहोत, की सर्व लष्करी उपाय योजून पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी, जेणे करून स्वातंत्र्यापूर्वी व नंतर भारतीय नेत्यांनी जी स्वप्ने पाहलिी होती ती पूर्ण करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे भारत जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकेल, असे घडल्यास भारतीय संस्कृतीचा शांततेचा सहअस्तित्वाचा संदेश कृतीसह जगात अमलात आणता येईल.
अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला, पाकिस्तानची दहशतवादी कृत्ये यांचा सर्व वक्त्यांनी निषेध केला. सर्व धर्मांनी मानवता, सलोखा, शांततेचा संदेश दिला आहे. दहशतवाद्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. बंधुभाव कायम राहिला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या.
डॉ. पी. ए. इनामदार यांनी ठराव मांडला आणि उपस्थित सर्वांनी एकमताने तो मंजूर केला. शुक्रवारी पुण्यातील सर्व मशिदींमध्ये हा ठराव वाचून दाखवला जाणार आहे.

Web Title: Make 'unbroken India' with military measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.