बाइक टॅक्सीचा मार्ग मोकळा?; परवानगी देण्यास प्रशासन अनुकूल मात्र संघटनांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 06:45 AM2023-02-25T06:45:20+5:302023-02-25T06:45:47+5:30
राज्यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी या संवर्गातील वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
नितीन जगताप
मुंबई - राज्यभरातील रिक्षा संघटनांचा बाइक टॅक्सी संकल्पनेला कडाडून विरोध असताना, राज्यात आवश्यक त्या ठिकाणी बाइक टॅक्सींना परवानगी देण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात बाइक टॅक्सीला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा अहवाल १५ मार्चपर्यंत राज्य सरकारला देण्यात येणार आहे. ओला, उबर, रॅपिडो यांच्या बाइक टॅक्सीबाबत धोरण ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे.
राज्यात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी या संवर्गातील वाहनांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी परिवहनेतर संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनांचे नियमन करून, त्यांना ‘ॲग्रीगेटर’ म्हणून महाराष्ट्रात सेवा बजावता यावी, यासाठी समिती नेमली आहे. या वाहनांमुळे इतर वाहनांच्या उत्पन्नावर ही परिणाम होत आहे. त्यामुळे बाइक टॅक्सीसेवेला ‘ॲग्रीगेटर’ म्हणून राज्यात परवानगी द्यावी का, त्यांना कोणत्या मुद्द्यावर परवानगी द्यावी वगैरे मुद्द्यांवर विचार करण्यासाठी माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने अलीकडेच रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यात बाइक टॅक्सीला विरोध दर्शविण्यात आला.
बाइक टॅक्सीला मागणी
बाइक टॅक्सीला प्रवाशांची चांगली मागणी आहे. बाइक टॅक्सी परवडणारी आहे, तसेच ती कमी जागा व्यापते. या सेवेमुळे प्रवासाला कमी वेळ लागून कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचता येईल, असे परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
कुठे परवानगी मिळणार?
राज्यात ज्या ठिकाणी वाहतुकीची अन्य सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते, अशा ठिकाणी बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे.
काय असतील नियम?
रिक्षासाठीचे नियम लागू असणार
बाइक टॅक्सीची परिवहनेतर संवर्गात नोंदणी होईल.
बाइक टॅक्सी चालकाला बॅचची सक्ती.
बाइक टॅक्सीला पिवळ्या रंगाची नंबरप्लेट असणार
बाइक टॅक्सीबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व बाजूंनी विचार करून, मगच अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर, निर्णय घेतला जाईल. - विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त
बाइक टॅक्सीविरोधात आम्ही पुण्यामध्ये रस्त्यावरची लढाई जिंकलो. सुप्रीम कोर्टातही आमचा विजय झाला. आता बाइक टॅक्सीला परवानगी देण्याच्या हालचाली समितीने सुरू केल्या आहेत. राज्यात कोणत्याही परिस्थितीत बाइक टॅक्सीला परवानगी देऊ नये, अन्यथा तीव्र विरोध केला जाईल.- बाबा कांबळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती.