‘मेक युवर सिटी स्मार्ट’ स्पर्धेची घोषणा
By Admin | Published: June 23, 2016 02:04 AM2016-06-23T02:04:39+5:302016-06-23T02:04:39+5:30
स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पुण्यात होत असलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ या देशव्यापी स्पर्धेची महत्त्वपूर्ण घोषणा केली
पुणे : स्मार्ट सिटी योजनेच्या घोषणेची वर्षपूर्ती होत असल्यानिमित्त पुण्यात होत असलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेक युवर सिटी स्मार्ट’ या देशव्यापी स्पर्धेची महत्त्वपूर्ण घोषणा केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. त्याचबरोबर देशातील ९८ स्मार्ट सिटींच्या प्रोजेक्टची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्तीचा कार्यक्रम पुण्यामध्ये घेतला जात आहे. मोदी यांच्या पुणे दौऱ्यातील २५ जूनच्या कार्यक्रमाची माहिती कुणाल कुमार यांनी मंगळवारी दिली. या कार्यक्रमाला केवळ ५ हजार निमंत्रितांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शहरातील नागरिकांना या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी प्रमुख चौकांमध्ये स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मोदी यांचे २५ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता लोहगाव विमानतळावर आगमन होईल. तेथून ४ वाजता ते बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामधील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील. त्यानंतर तिथे लावण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रदर्शनातील स्टॉलला ते भेट देतील. ‘मेक युवर सिटी क्लिन’ या महत्त्वाकांक्षी स्पर्धेची घोषणा मोदी या वेळी करतील. (वार्ताहर)