आपले गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करा
By Admin | Published: August 24, 2016 08:36 PM2016-08-24T20:36:21+5:302016-08-24T20:36:21+5:30
कुटुंबस्तर संवाद अभियानात गृहभेटीच्या माध्यमातून शौचालय नसलेल्या कुटुंबाला अस्वच्छतेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम चांगल्या पद्धतीने समजावून सांगा
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 24 : कुटुंबस्तर संवाद अभियानात गृहभेटीच्या माध्यमातून शौचालय नसलेल्या कुटुंबाला अस्वच्छतेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम चांगल्या पद्धतीने समजावून सांगा. आपले गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी गावातील प्रत्येकाने खारीचा वाटा उचलून योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी केले.
कुटुंबस्तर संवाद अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या उत्तर सोलापूर तालुकास्तरीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे , उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती सुरेखा पाटील, गटविकास अधिकारी सुरेवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एम.कुलकर्णी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ़ गायकवाड , संवाद तज्ज्ञ सचिन सोनवणे आदी उपस्थित होते.
जि़ प़ अध्यक्षा जयमाला गायकवाड पुढे म्हणाल्या, एखादे गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्याबरोबरच शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा, बचत गटाच्या महिला यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. गावात एखादी व्यक्ती ही गाव, समाज बदलू शकते, त्यामुळे गावात कुटुंबस्तर संवाद अभियानात गृहभेटीच्या माध्यमातून शुद्ध पाणी व शौचालय वापराबाबत प्रबोधन करावे. उत्तर सोलापूर तालुका येत्या दोन आॅक्टोबर २०१६ पर्यंत १०० टक्के हागणदारीमुक्त करावा, असे आवाहन अध्यक्षा जयमाला गायकवाड यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, गाव करी ते राव काय करी याप्रमाणे गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रत्येकाने शिवधनुष्य उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी गावात वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांना शौचालय कशासाठी बांधायचे हे गृहभेटीच्या माध्यमातून त्यांच्या मनावर चांगल्या पद्धतीने बिंबवा. कारण एखाद्या घरात आजारपणावर वर्षाला सुमारे ३० हजार रुपये खर्च होतात. उत्तर सोलापूर तालुका येत्या दोन आॅक्टोबर २०१६ पर्यंत १०० टक्के हागणदारीमुक्तकरण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे सांगितले. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी कुटुंबस्तर संवाद अभियान अंतर्गत गृहभेटी कशा पद्धतीने कराव्यात याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.