स्वत:च्याच खुनाचा बनाव
By Admin | Published: May 20, 2016 01:24 AM2016-05-20T01:24:47+5:302016-05-20T01:24:47+5:30
मद्यपी तरुणाचा खून करून त्याचा चेहरा जाळून स्वत:चाच खून झाल्याचा बनाव रचणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले
पुणे : मद्यपी तरुणाचा खून करून त्याचा चेहरा जाळून स्वत:चाच खून झाल्याचा बनाव रचणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे. कर्जबाजारीपणामुळे सावकारांची दिशाभूल करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे, उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली. मंगळवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह कात्रज येथील अभिनव महाविद्यालयाजवळ आढळून आला होता.
अविनाश ऊर्फ पप्पू संपत मरळ (वय ३१, रा. जनता वसाहत) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सतीश बाबू भालेराव (वय ३५, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भालेराव याचे लग्न झालेले असून त्याला २ मुली आहेत. भालेराव रात्री रिक्षा चालवतो. दारूचे व्यसन असल्यामुळे त्याच्यावर ७ लाख रुपयांचे कर्ज होते. या पैशांसाठी सावकार त्याच्यामागे तगादा लावत होते. तर खून झालेला अविनाश २ बहिणींसह राहण्यास होता. तो पेंटिंगची कामे करायचा. सोमवारी भालेराव दांडेकर पूल भागात गेला होता. तेथे दारूच्या नशेत बेधुंद झालेल्या अविनाशला त्याने निलायम सिनेमागृहाजवळ रिक्षामध्ये कोंबले. कात्रज बाह्यवळण रस्त्यावरच्या अभिनव महाविद्यालयाजवळील लक्ष्मीबाई हजारे वसतिगृहापाशी नेले. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्यावर अंगावर आणि चेहऱ्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. स्वत:च्या अंगावरील कपडे अविनाशच्या अंगावर चढवले. त्याचे कपडे जाळून टाकल्यानंतर स्वत:चा बूट अविनाशच्या पायात घातला. मृतदेहाच्या अंगावरच्या कपड्यांच्या खिशामध्ये स्वत:चे आधारकार्ड आणि काही कागदपत्रे ठेवली.
मंगळवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर पोलीस घटनास्थळी धावले व तपासाला सुरुवात केली. आधारकार्डवरून पोलीस भालेरावच्या घरी पोचले. त्यांनी कुटुंबीयांना मृतदेह दाखवला. मात्र, तो भालेरावचा नसल्याचे समजल्यावर पोलिसांनी भालेरावचा शोध सुरु केला. पोलीस कर्मचारी सचिन ढवळे, गणेश चिंचकर, प्रणव संकपाळ यांना आरोपी हुबळी येथे असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला मित्राकडे खेडशिवापूरला गेलेला भालेराव ट्रकने कोल्हापूर आणि तेथून हुबळी येथे गेला. पोलिसांनी माग काढत हुबळीमधून मुसक्या आवळल्या.