Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 06:00 AM2019-07-10T06:00:00+5:302019-07-10T12:15:14+5:30

चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे यान पाठविणार आहे.

making of Chandrayaan 2 booster in walchandnagar | Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर'

Video: 'चांद्रयान-२'च्या रॉकेटला महाराष्ट्राची 'पॉवर'; 'वालचंदनगर'मध्ये बनले इंधन साठवणारे 'बूस्टर'

Next
ठळक मुद्देअंतराळ संशोधन मोहिमेत कंपनीचा मोलाचा वाटा इस्रोच्या शास्त्रज्ञांबरोबर केले विकसित या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश

- निनाद देशमुख

पुणे : चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी  १५ जुलै रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान २ मोहिमेद्वारे चंद्रावर यान पाठविणार आहे. या मोहिमेसाठी ‘जीएसएलव्ही मार्क ३’ या प्रक्षेपास्त्राचा वापर करण्यात येणार असून त्याला अवकाशात झेपावण्यासाठी लागणारे बूस्टरचे केसिंग इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविण्यात आले आहे. या प्रकारची क्षमता असणारा भारत जगातील पाचवा देश ठरला आहे.

अवकाश मोहिमांत विविध विक्रम प्रस्थापित करून इस्रोने देशाचे नाव मोजक्या देशांच्या यादीत नेले आहे. गेल्या दशकात अनेक अंतराळ मोहिमा आखत देशाचा लौकिक वाढविला आहे. या मोहिमांसाठी लागणारी महत्त्वाची प्रणाली बनविण्याची जबाबदारी  इस्रोेच्या शास्त्रज्ञांनी वालचंदनगर इंडस्ट्रीला दिली आहे. ही जबाबदारी या कंपनीच्या अभियंत्यांनी लीलयापार पाडली आहे. चांद्रयान १ मोहिमेबरोबरच मंगळ यान मोहिम तसेच एकाच वेळी १०० पेक्षा अधिक उपग्रह सोडण्यासाठी पहिल्या स्टेजमधील महत्त्वाची बूस्टर केसिंग वालचंदनगर कंपनीच्या अभियंत्यांनी बनविली आहे.

कंपनीने यासाठी खास व्यवस्था केली आहे. यासाठी लागणारे पोलाद इस्रोने उपलब्ध करून दिले आहे. त्यावर प्रक्रिया करण्याचे अत्यंत अवघड काम वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये करण्यात आले. अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी भारताकडे पीएसएव्ही आणि जीएसएलव्ही मार्क ३ ही प्रक्षेपास्त्र आहेत. ते अवकाशात पाठविण्यासाठी बूस्टर गरजेचे असते. 

काय आहे बूस्टर प्रणाली
कुठल्याही प्रक्षेपास्त्राला अंतराळात झेपावण्यासाठी पहिल्या स्टेजमध्ये बूस्टर प्रणाली महत्वाची असते. या बुस्टरमध्ये घनरूपातील इंधन असते. या इंधनाच्या जोरावर प्रक्षेपास्त्र अवकाशात पाठविले जाते. प्रक्षेपास्त्राला हवेत दिशा देण्यासाठी लागणारी ‘एस २०० फ्लेक्स नॉझल कंट्रोल टँकेज’ यंत्रणाही वालचंदनगर इंडस्ट्रीतील अभियंत्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने विकसित केली आहे. 
संरक्षण सिद्धतेत देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मोलाचे योगदान भारताच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात परदेशातून शस्त्रास्त्र आयात केली जातात. मात्र, संरक्षण सिद्धतेत देश स्वयंपूर्ण व्हावा, या हेतून अनेक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून वालचंदनगर इंडस्ट्रीद्वारे ती विकसित करण्यात येत आहे. देश स्वयंपूर्ण व्हावा या एकमेव उद्देशाने वालचंद हिराचंद यांनी विमान, जहाजे व मोटारी या क्षेत्रात पाय रोवले. आज अवकाश तंत्रज्ञानाबरोबर अणुतंत्रज्ञानातही वालचंद इंडस्ट्रीने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

अंतराळ क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ मोलाची कामगिरी करत आहेत. अंतराळ मोहिमेसाठी लागणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रणाली वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविल्या जात आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. 
- जी. के. पिल्लई व्यवस्थापकीय संचालक, वालचंदनगर इंडस्ट्रीज.
 

Web Title: making of Chandrayaan 2 booster in walchandnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.