‘पीएचडी’ करणे आता आणखी अवघड
By admin | Published: July 28, 2016 09:52 PM2016-07-28T21:52:33+5:302016-07-28T21:52:33+5:30
देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘पीएचडी’ची बजबजपुरी माजली आहे. संशोधनाचा स्तर वाढावा यासाठी ‘युजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) अगोदरच पावले उचलली होती
Next
id="yui_3_16_0_ym19_1_1469712781361_20377">‘युजीसी’चे नवे नियम : पदव्युत्तर अभ्यासक्रमात ५५ टक्के गुणांची अट
नागपूर : देशभरातील विद्यापीठांमध्ये ‘पीएचडी’ची बजबजपुरी माजली आहे. संशोधनाचा स्तर वाढावा यासाठी ‘युजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) अगोदरच पावले उचलली होती. परंतु आता जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार ‘पीएचडी’ करणे आणखी कठीण होणार आहे. ‘पीएचडी’ नोंदणीसाठी उमेदवारांना आता पदव्युत्तर अभ्यासक्रमात कमीत कमी ५५ टक्के गुण किंवा समकक्ष श्रेणी असली पाहिजे, अशी अट टाकण्यात आली आहे. यामुळे ‘पीएचडी’ नोंदणीसाठी इच्छुक असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येणार आहे.
देशातील अनेक विद्यापीठांतून ‘पीएचडी’ करणे फारच सोपे आहे, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु गेल्या काही कालावधीपासून ‘युजीसी’ने ‘पीएचडी’ची बजबजपुरी थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहे. यातच आता समोर जात ‘युजीसी’ने नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’ नोंदणीसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांत ४५ ऐवजी आता ५० टक्के गुण अनिवार्य राहणार आहेत. तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही टक्केवारी ५० वरुन ५५ करण्यात आली आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांत जास्त अभ्यास करणे अनिवार्य झाले आहे. याशिवाय ‘पीएचडी’ प्रबंध सादर करण्याच्या कालावधीतदेखील बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला उमेदवार नोंदणीनंतर २ वर्षे ते ५ वर्षे या कालावधीत प्रबंध सादर करु शकत होता. आता ही अट कमीत कमी ३ वर्षे व जास्तीत जास्त ६ वर्षे अशी करण्यात आली आहे. दिव्यांग व महिला उमेदवारांना ही मर्यादा जास्तीत २ वर्ष वाढवून देण्यात येऊ शकते.
मार्गदर्शकांच्या निकषांमध्ये बदल
आतापर्यंतच्या नियमावलीनुसार एका मार्गदर्शकाअंतर्गत जास्तीत जास्त ८ उमेदवार संशोधन करु शकत होते. परंतु ‘युजीसी’च्या नव्या नियमांनुसार ही मर्यादा केवळ ‘प्रोफेसर’साठी राहणार आहे. ‘असोसिएट प्रोफेसर’कडे जास्तीत जास्त ६ व ‘असिस्टंट प्रोफेसर’कडे जास्तीत जास्त ४ उमेदवार राहू शकतील. यामुळे अनेक विद्यापीठांत मार्गदर्शकांची कमतरता जाणवणार आहे. संबंधित मार्गदर्शक हा विद्यापीठ किंवा महाविद्यालयात पूर्णकालीन प्राध्यापक असला पाहिजे. ज्या महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत, तेथेच उमेदवार ‘पीएचडी’साठी नोंदणी करु शकतो, असेदेखील ‘युजीसी’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.