साध्वी, कर्नल पुरोहित यांच्यावरील ‘मकोका’ रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:21 AM2017-12-28T05:21:55+5:302017-12-28T11:32:46+5:30
मुंबई : सन २००८मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींना येथील विशेष न्यायालयाने ‘मकोका’च्या आरोपांतून मुक्त केले.
मुंबई : सन २००८मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींना येथील विशेष न्यायालयाने ‘मकोका’च्या आरोपांतून मुक्त केले. त्यांच्यावर बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायदा व भारतीय दंड विधानातील गुन्ह्यांसाठी खटला चालेल असे न्यायालयाने स्पष्ट केले. तीन आरोपींना मात्र पूर्णपणे दोषमुक्त केले.
या खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी एकूण १० आरोपींनी अर्ज केले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्यास विरोध केला होता. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. टेकाळे यांनी यापैकी फक्त शिवनारायण कलसांग्रा, श्याम साहू व प्रवीण टक्कलकी या तीन आरोपींना पूर्णपणे दोषमुक्त केले.
>साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व लेफ्ट. कर्नल ठाकूर यांच्याखेरीज सुधाकर द्विवेदी, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी आणि अजय राहिरकर या आरोपींवरील ‘मकोका’चे आरोप काढून टाकले गेले. त्यांच्यावर दहशतवादी कृत्ये करणे, कट रचणे आणि हत्या या आरोपांसाठी बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या कलम १६ व १८ तसेच भादंविच्या कलम १२० बी, ३०२, ३०७ व ३२६ या अन्वये खटला चालविला जाईल.
>काय होती घटना?
२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील भिक्कू चौक येथील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते.
ज्यांच्याविरुद्ध खटला चालणार आहे त्या सर्व आरोपींनी आरोप निश्चितीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहावे, असा आदेशही दिला गेला. बॉम्बस्फोटातील दुचाकीचा वापर कशासाठी होणार, याची कल्पना साध्वीला होती. त्यामुळे साध्वीची या कटातून आरोपमुक्तता करता येणार नाही, असे साध्वीचा आरोपमुक्ततेचा अर्ज फेटाळताना न्या. एस. डी. टेकाळे यांनी नमूद केले. जगदीश म्हात्रे व राकेश धावडे या दोन आरोपींवर फक्त शस्त्र कायद्यान्वये खटला चालविला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७, २० व २३ अन्वये प्रस्तावित केलेले आरोप सर्व आरोपींवरून काढून टाकल्याचेही न्यायाधीश टेकाळे यांनी स्पष्ट केले.