मालेगावमध्ये टेक्स्टाईल पार्क, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी : ३०० कोटी रुपये खर्च करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 04:27 AM2017-07-28T04:27:11+5:302017-07-28T04:28:11+5:30
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरानजीक १२ किलोमीटरवर अत्याधुनिक सुविधांसह महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरानजीक १२ किलोमीटरवर अत्याधुनिक सुविधांसह महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शेती महामंडळाच्या मालकीची सुमारे ७०० हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. या महामंडळाकडून मालेगावच्या पूर्व भागात असलेली ही जमीन एमआयडीसीला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या संदर्भात सहा महिन्यांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकदेखील झाली होती.
यंत्रमाग आणि हातमागासाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावमधील वस्रोद्योग या पार्कच्या निमित्ताने कात टाकणार आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरातील अनेक वस्रोद्योग मालकांना स्थलांतरित होण्याची इच्छा आहे. अशा उद्योगांना मालेगावच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये येण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. अमरावती येथे शासनाचा टेक्स्टाईल पार्क आधीपासूनच आहे. मालेगावमध्ये या आधीही टेक्स्टाईल क्लस्टरची घोषणा झाली होती पण एकही उद्योग त्या ठिकाणी आला नाही.
आता नवीन टेक्स्टाईल पार्कमध्ये वस्रोद्योग मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी काही विशेष सवलती राज्य शासनाकडून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कुशल आणि अकुशल कामगार हे कमी मजुरीवर उपलब्ध होतील. त्यामुळे वस्रोद्योग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील, असा शासनाचा कयास आहे.