माळीण दुर्घटनेला दोन वर्षे उलटूनही पुनर्वसन नाहीच!
By Admin | Published: July 29, 2016 08:43 PM2016-07-29T20:43:53+5:302016-07-30T00:27:50+5:30
निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैैवी माळीणच्या घटनेला दि. ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत.
माळीणकरांची दिवाळी नवीन घरात
घोडेगाव : निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून अख्खं माळीण गाव ढिगा-याखाली सापडून अनेकांचा दुर्दैैवी अंत झाला होता. या दुर्घटनेला ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र माळीण दुर्घटनाग्रस्तांचं कायमस्वरूपी पुनर्वसन अजूनही झालेले नाही. त्यानिमित्तानं आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला हा आढावा.
माळीण दुर्घटनेची पहिल्यांदा माहिती सगळ्यांना लोकमतच्या प्रतिनिधीनं कळविली आणि मग त्या दुर्घटनेचे मोबाईलमध्ये काढलेले फोटो लोकमत कार्यालयाला पाठविले. 'लोकमत ऑनलाइन'वर तो फोटो आल्यावर जगाला या घटनेची माहिती समजली. दुर्घटनेचे तीन फोटो अविनाश थोरात यांना व्हॉट्सअॅपवर टाकले. या तीन पैकी एकच फोटो त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी तो 'लोकमत ऑनलाईन'च्या टीमला पाठविला. ऑनलाईनवर तो आल्यावर हाच माळीण दुर्घटनेचा सर्वात पहिला फोटो संपूर्ण जगापुढे गेला. इतर माध्यमांनीही लोकमतकडूनच हे फोटो घेतले. आज तक न्यूज चॅनेलने तर सौजन्य लोकमत असे नाव फोटोला दिले होते. असो. सांगायचं तात्पर्य एवढं की, शासनाकडून तसेच सेवाभावी संस्थांकडून ही दुर्दैवी घटना घडलेल्या गावाला आर्थिक व वस्तुरूपी खूप मदत मिळाली. एका वर्षात पक्की घरे बांधून देऊ, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते; मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. सध्या नवीन माळीण गाव उभारण्याचे काम सुरू असून, दिवाळीपर्यंत घरे ताब्यात दिली जातील, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
(माळीणची दुर्घटना पाहून सुन्न झालो)
माळीण दुर्घटनेत ४० कुटुंबांतील १५१ लोक ढिगाऱ्याखाली सापडून मयत झाले. यातील ९ लोक जखमी अवस्थेत सापडले, तर ३८ लोक बाहेरगावी कामानिमित्त गेल्याने वाचले. शासनाकडून मयतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तीमागे ८.५० लाख रुपये देण्यात आले व विविध योजनांमधून मदत करण्यात आली. दुर्घटना घडल्याबरोबर दोन महिन्यांत माळीण फाट्यावर तात्पुरती शेड उभारून येथे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले. कायमस्वरूपी पुनर्वसन एक वर्षात करून देण्याचे आश्वसन देण्यात आले होते. मात्र कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी जागा मिळण्यास वेळ गेल्याने हे काम लवकर सुरू होऊ शकले नाही.
जागा शोधमोहीम सुमारे सव्वा वर्ष चालली. प्रथम अडिवरे, कोकणेवाडी, झांजरेवाडी, कशाळवाडी, चिंचेचीवडी या पाच जागा पाहण्यात आल्या; मात्र वेगवेगळ्या अडचणींमुळे या जागह रद्द झाल्या. शेवटी नव्याने आमडेची जागा पाहण्यात आली व या जागेला ग्रामस्थ, जीएसआर अशा सर्वांनीच होकार दिला. सध्या या आठ एकर जागेवर नवीन गाव वसवण्याचे काम सुरू आहे. पावसाळा असल्यामुळे हे बंद असले, तरी दिवाळीपूर्वी घरांची कामे पूर्ण करून लोकांना ताबा दिला जाणार असल्याचे प्रशासन सांगत आहे.
या नवीन गावात ६७ घरे बांधण्यात येणार असून, सर्व बारा मूलभूत सेवासुविधा दिल्या जाणार आहेत. सध्या १२ घरांची कामे पूर्ण झाली आहेत, तसेच गुरांचा गोठा, ग्रामपंचायत व तलाठी इमारत ही कामेदेखील पूर्ण झाली आहेत. तसेच दुर्घटना घडलेल्या ठिकाणी स्मृतिवनाचे कामदेखील सुरू आहे. पावसामुळे येथे काम करणे अशक्य झाल्यामुळे पुनर्वसनाचे काम बंद आहे. पावसामुळे या जागेवर सर्वत्र राडारोडा पसरलेला आहे.
मात्र, माळीण दुर्घटनेतून वाचलेल्या १६ अंशत: बाधित कुटुंबांचे प्रचंड हाल झाले. शासनाने मयत कुटुंबीयांच्या वारसांना भरघोस मदत केली. मात्र अंशत: बाधित कुटुंबांना काहीच मदत दिली नाही. पुरेशी तात्पुरती निवारा शेडही मिळाली नाही, त्यांच्या घरांमध्ये चोऱ्या झाल्या, दुर्घटनेतून वाचलेली जनावरे बांधण्यास जागा मिळाली नाही. त्यामुळे आजही काही कुटुंबे दुसऱ्याच्या घरांमध्ये राहून दिवस काढत आहेत.
सध्या माळीण ग्रामस्थ माळीण फाट्यावरील तात्पुरत्या निवारा शेडमध्ये राहात आहेत. ही पत्र्याची शेड १२५ चौरस फुटाची असून, या तोकड्या जागेत अनेक गैरसोर्इंना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरू नये म्हणून ग्रामस्थांनी घरांच्या पुढे साधे लाकूड, पत्रा व प्लॅस्टिक कागदांचे शेड ओढली आहे. येथे प्यायला पाणी नसल्याने महिला हपश्यावरून पाणी वाहात आहेत. या छोट्याशा घरांमध्ये राहून वैतागलेले ग्रामस्थही नवीन घरे पूर्ण होण्याची वाट पाहात आहेत.
तसेच माळीण दुर्घटनेतील नातेवाइकांची रजा मंजूर करण्यात येईल असे माळीण दुर्घटनेला भेट देणाऱ्या प्रत्येक नेत्याने आश्वासन दिले होते. मात्र अजूनही काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर झाल्या नाहीत. माळीण दुर्घटनेत बाधित झालेल्या युवक व युवतींसाठी अनेक वेळा रोजगार मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात येणाऱ्या खासगी कंपन्या ६ ते ८ हजार रुपये पगाराच्या नोकऱ्या देत होते. या पगारावर मंचर, चाकण, भोसरी यासारख्या ठिकाणी राहून काम करणे परवडत नसल्याने अनेकांनी नोकऱ्या सोडून दिल्या व आज पुन्हा घरी शेती करून आपला उदरनिर्वाह भागवत आहेत.
माळीण ग्रामस्थांनी दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता द्वितीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ठेवला आहे. या दिवशी सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मान्यवर जमून मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.