माळीणकरांना तात्पुरता निवारा मिळाला
By admin | Published: October 6, 2014 04:35 AM2014-10-06T04:35:30+5:302014-10-06T04:35:30+5:30
माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना रविवारी तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निवारा शेडचे वाटप करण्यात आले
घोडेगाव (जि. पुणे) : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबीयांच्या २५ वारसांना रविवारी तात्पुरता निवारा मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निवारा शेडचे वाटप करण्यात आले. मात्र ज्यांना घरे मिळाली नाहीत, त्यांनी नाराजी व्यक्त केली.
माळीण गावावर ३० जुलैला डोंगर कोसळून १५१ लोक मृत्युमुखी पडले. मृतांच्या वारसांना राहण्यासाठी माळीण फाट्यावर पत्र्याच्या निवारा शेड बांधण्यात आल्या आहेत. एकूण ३२ शेडची आवश्यकता असताना प्रत्यक्षात सध्या २५ निवारा शेड उभ्या करण्यात आल्या.
आसाणे आश्रमशाळेत राहणारे तसेच माळीण परिसरात नातेवाइकांच्या आश्रयास असलेले तसेच खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या लोकांना प्रथम घरे देण्यात आली. तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना नंतर निवारा शेड देण्यात येणार आहे. मात्र निवारा शेड न मिळालेल्यांनी दिवाळीपर्यंत घरे मिळाली नाहीत तर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
तातडीची गरज असलेल्या लोकांना आधी घरे दिली आहेत. ७२ पक्की घरे बांधायची असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या ८ एकर जागेचा प्रश्न सुटलेला नाही. त्यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी. हा प्रश्न सुटल्याबरोबर कायमस्वरूपी पुनर्वसनाचा आराखडा तयार केला जाईल. त्यात रस्ते, वीज-पाण्यापासून सर्व नागरी सुविधा देण्याची दक्षता आम्ही घेणार आहोत, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)