माळीणकरांना मिळणार हक्काची घरे
By admin | Published: March 27, 2017 02:30 AM2017-03-27T02:30:35+5:302017-03-27T02:30:35+5:30
माळीण ग्रामस्थांना आपल्या हक्काची घरे २ एप्रिल रोजी मिळणार आहे. माळीण पुनर्वसन व स्मृतिस्थळाचे उद्घाटन व
घोडेगाव : माळीण ग्रामस्थांना आपल्या हक्काची घरे २ एप्रिल रोजी मिळणार आहे. माळीण पुनर्वसन व स्मृतिस्थळाचे उद्घाटन व घरांचे हस्तांतर कार्यक्रम या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
३० जुलै २०१४ रोजी माळीण दुर्घटना घडली होती. यामध्ये ४४ घरे व १५१ लोक मृत्युमुखी पडले होते. जवळजवळ संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यामुळे येथील ग्रामस्थ बेघर झाले होते. या ग्रामस्थांना हक्काची घरे देण्यासाठी आमडे गावच्या हद्दीत ८ एकर जागेवर नवीन गावठाण उभारण्यात आले आहे. येथे घरे व १८ मूलभूत सोईसुविधांची कामे पूर्ण झाली आहे. माळीणकरांना या घरांचे हस्तांतर, स्मृतिस्तंभाचे व विविध कामांचे उद्घाटन २ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
महसूल मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, दिलीप कांबळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित राहणार आहेत. या वेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृतिवनावर श्रद्धांजली अर्पण करून घरांचे हस्तांतरण व सभेचा कार्यक्रम नवीन माळीणमध्ये होणार असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले. कामाची पाहणी व उद्घाटन कार्यक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी सौरभ राव येथे आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अर्जुन म्हसे पाटील, कल्याण पांढरे, राम पठारे, प्रशांत पाटील, विवेक माळुंदे, एस. बी. देवढे, रवींद्र सबनीस, एल. टी. डाके, योगेश महाजन, विजय केंगले, विनय बडेरा उपस्थित होते. (वार्ताहर)
आमडे येथील पाणीप्रश्न सोडवण्याची ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रमात काही सेवाभावी संस्थांचा सत्कार करावयाचा आहे, त्याचा विचार प्रशासनाने करावा. तसेच घरे सुंदर झाली. मात्र, विहिरीला पाणी न लागल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी पाण्याची उपलब्धता करावी, पावसाळ्यात गावात साठणारे पाणी बाहेर काढण्यासाठी नियोजन करावे, अशी सूचना ग्रामस्थांनी केली. माळीणमध्ये झालेल्या सर्व कामांची गुणवत्ता तपासून घेतली जाणार आहे. याचे थर्ड पार्टी आॅडिट कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग पुणे करत आहे. तसेच २ एप्रिलनंतरसुद्धा उर्वरित छोटी-मोठी कामे केली जातील व पाण्यासाठी घेतलेल्या विहिरीला सुरुवातीस पाणी लागले होते. मात्र, उन्हाळ्यात हे पाणी राहिले नाही. यासाठी नवीन स्रोत पाहून येथून पाणी घेऊ, असे जिल्ह्याधिकारी यांनी सांगितले.
माळीणवासीयांनी घरांचा वापर करणे आवश्यक : पांढरे
माळीणवासीयांनी घरांचा वापर करणे आवश्यक आहे. मूळ आराखड्यात कुठलाही बदल करता येणार नाही. त्याला कुठलेही नुकसान पोहोचवता येणार नाही. प्रशासनाच्या परवानगीशिवाय घरांचे हस्तांतरण करता येणार नाही व शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचा कोणी भंग करू नये, अशी माहिती या वेळी प्रांत अधिकारी कल्याण पांढरे यांनी ग्रामस्थांना दिली.