'मुंबई हाट'च्या माध्यमातून उभारणार मॉल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By Admin | Published: June 20, 2016 08:59 PM2016-06-20T20:59:41+5:302016-06-20T20:59:41+5:30
महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे ब्रँडिंग करण्यासाठी 'मुंबई हाट'च्या माध्यमातून महिला बचत गट मॉल सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे ब्रँडिंग करण्यासाठी 'मुंबई हाट'च्या माध्यमातून महिला बचत गट मॉल सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महिला बचतगटांसाठी मुंबईत सब-वे मॉल सुरु करण्यासंदर्भात आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.
महिला बचतगटांच्या माध्यमातून तयार करण्यात येणा-या उत्पादनांची विक्रीदेखिल महिलांनीच करावी या उद्देशाने कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाकडून प्रायोगिक तत्वावर 'मुंबई हाट' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मुंबईतील मेट्रो सिनेमालगत असणा-या भुयारी मार्गामध्ये बचतगटांना आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी स्टॉल्स् दिली जाणार आहेत. या भुयारी मार्गात नऊ मार्गिका असून या ठिकाणी डिजिटल म्युझियम, दाग-दागिने,गृह सजावटीच्या वस्तू, सेंद्रीय पध्दतीने बनविलेले खाद्य पदार्थ, सेल्फी झोन अशा वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, आठवड्यातील चार दिवस 'मुंबई हाट' हा प्रकल्प राबविण्यात यावा. दक्षिण मुंबईप्रमाणेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्येही अशाप्रकारचा प्रकल्प सुरु करावा. त्यामाध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळू शकेल. महिला बचतगट मॉल ठिकठिकाणी सुरु झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. दरवर्षी सरस प्रदशर्नाला मोठा प्रतिसाद मिळतो. महिला बचतगट मॉलच्या माध्यमातून सरस प्रदर्शन वर्षभर सुरु ठेवून प्रत्येक जिल्ह्यात एक आठवडा हे प्रदर्शन भरविण्याबाबत विचार करावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच बचतगटांचा हा मॉल सुरु झाल्यावर स्वच्छतेची निगा राखली जाईल तसेच भुयारी मार्गांमध्ये अतिक्रमण होणार नाही याचीही काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी 'मुंबई हाट' या उपक्रमाबाबत सादरीकरण केले. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव संजय कुमार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह आदी अधिकारी उपस्थित होते.