ईडीच्या कारवाईआधीच मल्ल्यांनी विकली संपत्ती
By admin | Published: June 13, 2016 11:58 AM2016-06-13T11:58:48+5:302016-06-13T11:58:48+5:30
सक्तवसुली संचलनालयाने कारवाईला सुरुवात करण्याआधीच कर्जबुडव्या विजय मल्ल्यांनी दोन ठिकाणची संपत्ती विकल्याची माहिती समोर आली
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र ईडीने कारवाई करण्याआधीच विजय मल्ल्यांनी आपली संपत्ती विकली आहे. विजय मल्ल्यांनी कोटींची किंमत असलेली दोन ठिकाणची संपत्ती विकल्याची माहिती समोर आली आहे. आयडीबीयच्या 900 कोटी कर्ज घोटाळ्यासंबंधी तपास करत असलेल्या ईडीने शनिवारी विजय मल्ल्यांची 1411 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.
विजय मल्ल्यांनी कुर्ग आणि याव्यतिरिक्त अजून एक ठिकाणी संपत्ती विकल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. मात्र यासंबंधी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. संपत्ती विकल्यानंतर मिळालेला पैसा विजय मल्ल्या यांच्या खात्यात जमा झाला आहे का ? याचा सध्या ईडी तपास करत आहे.
मनी लाँड्रिंगच्या आरोपाचा सामना करीत असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्यांना रेड कॉर्नर नोटिस पाठवण्यासाठी इंटरपोलकडे विनंती केली होती.
विजय मल्या यांना हद्दपार करून भारतात पाठविण्यास ब्रिटनने स्पष्ट नकार दिला होता. मल्ल्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी दुस-या पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. रेड कॉर्नर नोटिस जारी केल्याने मल्ल्या यांच्या अडचणी वाढतील आणि त्यांना भारतात आणणंही शक्य होईल. कारण रेड कॉर्नर नोटिस जारी केल्यामुळे मल्ल्या ब्रिटन सोडून इतर कोणत्याही देशात प्रवास करु शकत नाही, आणि जर त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्यांना अटक होऊ शकते. त्यामुळे ईडीने इंटरपोलला रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यास सांगितलं आहे, जेणेकरुन मल्ल्यांनी ब्रिटनबाहेर प्रवास केल्यास विमानतळावरुन त्यांना अटक करण्यात येईल.
मुंबई उच्च न्यायालयाने विजय मल्ल्यांविरोधात अजामीपात्र वॉरंट जारी केलं आहे. तसंच पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे या आधारावर ईडीने रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची विनंती केली गेली होती.