भिवंडीतील खाणावळीच कुपोषित

By admin | Published: February 27, 2017 04:00 AM2017-02-27T04:00:32+5:302017-02-27T04:00:32+5:30

भिवंडी शहराचे नाव उच्चारताच आजही संवेदनशील म्हणून आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते

Malnutrition in the fields of Bhiwandi | भिवंडीतील खाणावळीच कुपोषित

भिवंडीतील खाणावळीच कुपोषित

Next


भिवंडी शहराचे नाव उच्चारताच आजही संवेदनशील म्हणून आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण, केवळ हीच ओळख नाहीतर, कापड उत्पादन आणि यंत्रमागाचे शहर म्हणूनही प्रसिद्ध आहे. यंत्रमाग कारखान्यांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यांतून कामगार पोटाची खळगी भरण्यासाठी येथे आले आणि इकडचेच झाले. परिस्थिती बेताची असल्याने हे कामगार भाड्याने राहू लागले. आपल्या कुटुंबांना सोडून हे कामगार एकटे आल्यामुळे त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. पूर्वी या कारखान्यांमध्ये मराठी कामगार कामाला होते. त्यांनी एकत्र रक्कम जमा करून भिस्सी (खाणावळ) सुरू केली. आज भिवंडीत ५०० च्या आसपास खाणावळी आहेत. तेथे कामगार जेवतो. पण, त्या खरोखरच योग्य दर्जाच्या आहे का, हा खरा प्रश्न आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नाही तसेच पालिका, लोकप्रतिनिधी, यंत्रमागमालक यांचे दुर्लक्ष होत आहे. कमी पैशांमध्ये जेवण मिळत असल्याने पौष्टिक अन्न मिळणे तर दूरच, अत्यंत कोंदट, अस्वच्छ अशा खाणावळीत कामगारांना पोटपूजा करावी लागत आहे. २० वर्षांपूर्वी अशा भिस्सीतील जेवणामुळे १०५ जणांचा मृत्यू झाला. पण, याचा सर्वांना सोयीस्कररीत्या विसर पडला आहे.
या खाणावळी यंत्रमाग कारखान्यांच्या जवळपास किंवा कामगार वस्त्यांमध्ये आहेत. वर्षानुवर्षे शहरातील यंत्रमाग उद्योग दोन शिफ्टमध्ये सुरू आहे. भिस्सीत कसे अन्न मिळते, यामुळे त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याची चिंता कुणीही करत नाही. एका बाजूला यंत्रमाग कामगारांचे आर्थिक शोषण होत आहे. त्याचबरोबर त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे, अशी स्थिती शहरातील कामगारांची असताना येथील कामगार संघटनाही मूग गिळून आहेत.
>आता तरी यंत्रणा हलतील की बळी जाण्याची वाट पाहतील?
प्रत्येक जण पोटासाठी कष्ट करतो. पण, पोट भरण्यासाठी तो ज्या ठिकाणी जातो, ती जागा खरंच स्वच्छ आहे का, तेथे चांगल्या दर्जाचे अन्न मिळते का, हा खरा प्रश्न आहे. आधीच शंभरावर अधिक जणांचे बळी घेणाऱ्या भिवंडीतील खाणावळींकडे पाहिले की, ही परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. पर्यायच नसल्याने अस्वच्छ, कोंदट वातावरणात कामगारांना जेवावे लागते. तरीही यंत्रणा मात्र ढीम्म आहेत.

यंत्रमाग कारखान्यांत येणारा कामगार त्याच्या जबाबदारीवर आला असल्याने यंत्रमागमालक व कारखान्यांचे व्यवस्थापन केवळ चांगले कापड विणून घेण्यापुरता त्यांच्याशी संबंध ठेवते. कामाची मजुरी मालक १५ दिवस किंवा महिन्याने देत असल्यामुळे कामगारही भिस्सीच्या सरदारास (मालकास) त्याप्रमाणे जेवणाचे बिल देतो.
कापडाच्या व्यवसायात मंदीचा प्रभाव वाढला, तर मालकही कामगारांना त्यांची मजुरी वेळेवर देऊ शकत नाही. त्याचा परिणाम भिस्सीवर होतो. अशा वेळी वर्षानुवर्षे एकाच भिस्सीत जेवणाऱ्या कामगारास सरदार नियमित जेवण देतो. जर एखादा कामगार क्वचित येत असेल, तर त्याच्यावर उपाशी राहण्याची वेळ येते. मात्र, अशी दया दाखवणाऱ्या सरदाराचे बिल न देता पळून जाणारे महाभाग कमी नाहीत. अशा स्थितीत काही भिश्श्या बंद झाल्या. नुकसान होऊ नये, म्हणून काही सरदारांनी यंत्रमागमालकाशी थेट संधान साधत कामगारांना पोसण्याची हमी घेतली. असे संबंध वाढवत कालांतराने काही यंत्रमागमालक कामगारांची राहणे व खाण्याचीदेखील सोय करू लागले आहेत. त्यामुळे अशा भिस्सीमालकांना आता यंत्रमाग व्यवसायातील तेजीमंदीचे भय राहिलेले नाही. मात्र, नोटाबंदीच्या काळात भिस्सीमालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला.
भिवंडीमध्ये लॉजिंग हाही खाणावळीचा प्रकार झाला आहे. अशा खाणावळी बहुतांश गुजराती, मारवाडी कामगार व व्यापाऱ्यांसाठी सुरू आहेत. हॉटेलमध्ये मर्यादित जेवण मिळते, मात्र भिस्सी, लॉजिंगमध्ये पोटभरून जेवण मिळते. त्यामुळे या व्यवसायाची मोठी फळी शहरात आहे.
>हॉटेल, भिस्सी यातील खाद्यपदार्थांची तपासणी करण्याचे काम आरोग्य विभागाचे असले, तरी पालिका प्रशासनाने अशी कोणतीही व्यवस्था अथवा प्रयोगशाळा उपलब्ध करून दिलेली नाही. तसेच अशा खाद्यपदार्थांची तपासणी सरकारच्या अन्न विभागाकडून केली जाते. पालिका प्रशासनाने अशी तपासणी करण्याचे निर्देश न दिल्याने भिस्सी अथवा इतर ठिकाणी या विभागाकडून तपासणी केली जात नाही.
डॉ. विद्या शेट्टी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, भिवंडी पालिका
>भिवंडीतील अन्नपदार्थ तपासणीसाठी दोन व ग्रामीणमध्ये एक अन्नसुरक्षा अधिकारी नेमलेले असून त्यांच्याकडून भिस्सीतील अन्नाची तसेच इतर ठिकाणच्या खाद्यपदार्थांची तपासणी केली जाते. मात्र, भिवंडीतील कोणत्याही भिस्सीचालकावर अथवा हॉटेलचालकावर कारवाई झालेली नाही.
-महेश चौधरी, सहायक आयुक्त, अन्नसुरक्षा विभाग, ठाणे
भिस्सीचा व्यवसाय रामभरोसे
भिवंडी महापालिकेच्या परवाना विभागाने शहरातील विविध व्यावसायिकांना परवाना देण्यासाठी कंत्राट दिले आहे. मात्र, त्यामध्ये व्यवसायाची वर्गवारी नसल्याने शहरात एकूण भिस्सी किती आहे, त्यांची नोेंद नाही.
तसेच अग्निशमन दलाकडूनही दाखला दिला जातो. त्यांच्याकडेही भिस्सीच्या संख्येची नोंद नाही. २० वर्षांपूर्वी भिस्सीकांड होऊनही पालिका प्रशासन जागृत नाही. यावरून, शहरातील भिस्सी व्यवसाय रामभरोसे चालल्याचे स्पष्ट होते.

Web Title: Malnutrition in the fields of Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.