आदिवासीमंत्र्यांच्या शिवारातच कुपोषण
By admin | Published: March 11, 2016 04:18 AM2016-03-11T04:18:10+5:302016-03-11T04:18:10+5:30
पालघर व ठाणे जिल्ह्यातील ५४ हजार ९१५ बालके कुपोषित आहेत. या भागाला भेट देऊन पाहणी केली असता सरकारी यंत्रणेने वेळीच
सुरेश लोखंडे , ठाणे
पालघर व ठाणे जिल्ह्यातील ५४ हजार ९१५ बालके कुपोषित आहेत. या भागाला भेट देऊन पाहणी केली असता सरकारी यंत्रणेने वेळीच दखल घेतली नाही, तर २३ वर्षांपूर्वी याच परिसरात झालेल्या भीषण बालमृत्यूंची पुनरावृत्ती
अटळ असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघातच कुपोषणाने कहर केला आहे.
जव्हार, मोखाडा तालुक्यांतील दाभोसा, चिरेचापाडा, कोंगदा, वनवासी आदी परिसरांसह वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवर कुपोषित बालके असून मंत्री विष्णू सवरा यांच्या विक्रमगड मतदारसंघातच सर्वाधिक कुपोषित बालके असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात ४३ हजार ५५७ बालके कुपोषित आहेत. यात तीव्र कुपोषित सात
हजार ९१ बालकांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात१० हजार ३५८ बालके कुपोषित आहेत. यातील एक
हजार ५३१ बालके तीव्र कुपोषित आहेत. सध्या या परिसरात
वैद्यकीय सुविधा, रोजगार व प्रशासकीय यंत्रणांच्या जागरूकतेची कमतरता असल्याचे प्रत्यक्ष भेटीत जाणवले.
दाभोसा या सुमारे २५० लोकवस्तीच्या पाड्यावर पाच बालकांची प्रकृती अत्यंत खराब असल्याचे दिसून आले. यातील दुर्गा ही एक वर्षाची बालिका अत्यंत कमी वजनाची आहे. जन्मत:च केवळ दोन किलो वजनाची असलेली दुर्गा कशी जगवायची, हा तिच्या मातापित्यापुढील प्रश्न आहे. गावातील आदिवासींना पाणी मिळावे, याकरिता जलस्वराज योजनेतून विहीर खोदण्यात आली.
मात्र, सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने विहिरीचे पाणी एका मुंबईकराच्या रिसॉर्टला दिले जात आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.
१० वर्षांपूर्वी इंदिरा आवास
योजनेतून घरकुलच्या केवळ विटा आदिवासींना मिळाल्या. भिंती उभारण्याचा किंवा पत्र्यांची खरेदी या आदिवासींनीच केल्याचे गावकरी सांगतात.
विक्रमगड तालुक्यातील सजनपाड्यातील घराघरांत कुपोषित बालके असतानाही दरवर्षी पाळणा हलत आहे. जव्हारच्या वावर चौकीची तारा ही जेमतेम १६ वर्षांची अविवाहित मुलगी कुमारीमाता झाली आहे. तिचा सुदर्शन हा दीड वर्षाचा मुलगा कुपोषित आहे.