माळशेज घाट बंदच!
By admin | Published: August 8, 2016 01:36 AM2016-08-08T01:36:46+5:302016-08-08T01:36:46+5:30
माळशेज घाटात गेल्या आठवड्यात कोसळलेली दरड व करंजाळे गावाजवळ रस्त्याला मोठ्या भेगा पडून रस्ता खचण्याची भीती निर्माण झाल्याने हा मार्ग आठवडाभरापासून बंद आहे.
खोडद : माळशेज घाटात गेल्या आठवड्यात कोसळलेली दरड व करंजाळे गावाजवळ रस्त्याला मोठ्या भेगा पडून रस्ता खचण्याची भीती निर्माण झाल्याने हा मार्ग आठवडाभरापासून बंद आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले असून मंगळवापर्र्यत वाहतूक सुरळीत होईल असे ठाणे राष्ट्रीय महामार्गाचे स्थापत्य अभियंता एस. के. चौधरी यांनी सांगितले.
घाटात मंगळवारी (दि. २) रात्री दरड कोसळून या दरडीतील सर्व मलबा महामार्गावर आल्याने हा महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. तर गुरुवारी (दि. ४) माळशेज घाटाच्या अलीकडे करंजाळे गावाजवळ या नगर-कल्याण महामार्गावर रस्त्याला मोठ्या भेगा पडून रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली होती. राष्ट्रीय महामार्ग ठाणे विभागाच्या वतीने छत्री पॉइंटजवळील कोसळलेली दरड बाजूला करून महामार्ग मोकळा करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाच्या वतीने करंजाळे गावाजवळ महामार्गाला भेग गेलेल्या ठिकाणी रस्त्याच्या खालच्या बाजूला मुरूम टाकून भराव करण्याचे काम सुरू आहे.
दरड बाजूला करून महामार्ग मोकळा केल्यानंतर सदर कामाची माहिती स्थापत्य अभियंता एस. के. चौधरी यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना कळवून घाट वाहतूक सुरू करण्याविषयी परवानगी मागितली होती. मात्र, त्यांनी पावसाचे प्रमाण, घाटात पावसामुळे कोसळण्याच्या अवस्थेतील दरडी व पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी या बाबींचा विचार करून माळशेज घाटातून वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
चालू वर्षी माळशेज घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या ४ घटना घडल्या आहेत.
दरड कोसळल्यानंतर दरडीतील मलबा बाजूला करण्यासाठी वेळ
जातो. त्यातच घाट परिसरात
सतत कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे कामात वारंवार व्यत्यय येत असल्याने या कामांना विलंब होत आहे. (वार्ताहर)