माळशेज घाट दीर्घकाळ बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2016 03:40 AM2016-07-12T03:40:51+5:302016-07-12T03:40:51+5:30

कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात सोमवारी पाच ठिकाणी दरड कोसळल्याने हा घाट दीर्घकाळ वाहतुकीकरिता

Malshej Ghat for a long time! | माळशेज घाट दीर्घकाळ बंद !

माळशेज घाट दीर्घकाळ बंद !

Next

ठाणे : कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात सोमवारी पाच ठिकाणी दरड कोसळल्याने हा घाट दीर्घकाळ वाहतुकीकरिता बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. शुक्रवार, १५ जुलैपर्यंत घाट सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी जीवितहानी टाळण्याकरिता घाट महिनाभर बंद करण्याची ग्रामस्थांनी केलेली मागणी व मदतकार्यात पाऊस व धुके यामुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता दीर्घकाळ वाहतूक बंद राहण्याची चिन्हे आहेत. माळशेज घाटातील दरड कोसळणे रोखण्यासाठी ६०० कोटी रुपये खर्च करावे लागतील. एवढी मोठी रक्कम लागलीच उपलब्ध करून देणे अशक्य असल्याने प्रशासन हतबल आहे.
घाटातील वाहतूक शनिवारी रात्री सुरू होती. मात्र, त्याचदरम्यान ट्रकवर दरड कोसळल्यामुळे तो दरीत पडला. यातील चालकाचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. दरडीचा १२ मीटर रुंद ते १२० मीटर लांब मलबा उचलण्याचे प्रयत्न सुरू असले तरी पाऊस व धुके यामुळे या कामात व्यत्यय येत आहे. त्यातच, सोमवारी किमान पाच ठिकाणी मोठ्या स्वरूपाच्या दरडी कोसळल्याने घाटातील स्थिती गंभीर असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनीही मान्य केले.
घाटातील दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांना सर्व साधनांनिशी प्राधान्याने हा मार्ग मोकळा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, घाट कधी मोकळा होईल, हे सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया बांधकाम अधिकारी दिलीप सरोदे यांनी आमच्या शिरोशी येथील वार्ताहराला दिली. माळशेज घाटात सोमवारी पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. कल्याणचे प्रांत अधिकारी प्रसाद उकिरडे-पाटील यांनी घाटाला भेट दिली असून, घाट एक महिना बंद ठेवावा लागेल, असे संकेत दिले.
या महामार्गावरील वाहतूक सध्या शहापूर-आळेफाटामार्गे वळवली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Malshej Ghat for a long time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.