मामा हुंडा हवा, पण जुन्या नोटा नको !
By admin | Published: November 12, 2016 05:37 PM2016-11-12T17:37:13+5:302016-11-12T17:36:29+5:30
‘मामा, हुंडा हवाच; पण जुन्या नोटा घेऊन मी काय करू?’, वराच्या या युक्तीवादाने वधूपित्याची शक्तीच संपली.
Next
ऑनलाइन लोकमत/किशोर वंजारी
नेर (यवतमाळ), दि. 12 - लग्नासाठी सारी तजविज झाली होती. साक्षगंधही उरकले. काही दिवसांवर लग्न येऊन ठेपले. पण हुंड्याचे पैसे घेऊन आलेल्या वधूपित्याला वर पक्षाने आल्या पावली परत पाठविले. कारण चलनातून रद्द केलेल्या जुन्या नोटा होत्या. ‘मामा, हुंडा हवाच; पण जुन्या नोटा घेऊन मी काय करू?’, वराच्या या युक्तीवादाने वधूपित्याची शक्तीच संपली. शासनाने अचानक नोटा रद्द केल्याच्या निर्णयाचा फटका बसलेला हा वधूपिता अक्षरश: ढसाढसा रडला.
नेर शहरात घडलेला हा किस्सा समाजाची मानसिकता स्पष्ट करुन गेला. त्याचे झाले असे की, नेर शहरातील एका मुलीचे लग्न काही दिवसांपूर्वीच जुळले. वर पक्षाला काय-काय द्यायचे, हेही ठरले. साक्षगंधाचा कार्यक्रमही धडाक्यात पार पडला. लग्नाच्या खर्चासाठी वधूपित्याने आपली सारी कमाई बँकेतून काढून घरी आणली. त्यात सर्व 500, 1000 रुपयांच्याच जुन्या नोटा होत्या. बाकी खरेदी झाली. आता केवळ कपडे खरेदी करणे आणि हुंड्याची रक्कम पोहोचविणे शिल्लक होते.
हुंड्याची रक्कम वर पक्षाच्या घरी नेऊन देण्याचा दिवस निश्चित झाला. पण त्याच रात्री बातमी आली... 500, 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्या! सरकारच्या या घोषणेने वधू पित्याच्या पायाखालची जमिनच सरकली. तरीही हा वधूपिता आपल्या जवळची हुंड्याची रक्कम देण्यासाठी वर पक्षाच्या घरी गेला. परंतु, वराकडील मंडळीने या नोटा घेण्यास स्पष्ट नकार दिला.
रक्कम मोठी आहे. ती आता बँकेत जमा केली, तरी बँक केवळ चार हजार रुपयाचा ‘विड्रॉव्हल’ देणार.
तेवढ्या पैशात आम्ही लग्नाचा खर्च कसा भागवणार? असा सवाल वर पक्षाने वधूपित्यापुढे उपस्थित केला. खरे म्हणजे, हाच प्रश्न आता वधूपित्यापुढेही उभा होता. हताश मनाने वधूपिता जुन्या नोटांचे बंडल घेऊन घरी परतला. दुस-या दिवशी वडील मुलीला घेऊन कपडे खरेदीसाठी गेले. पण तिथेही सर्व दुकानदारांनी त्यांच्या नोटा नाकारल्या. शेवटी या चिंताग्रस्त पित्याने आपले गा-हाणे नेरमधील काही आप्त मित्रांना सांगितले. अनेकांनी त्याला तात्पुरते वापरण्यासाठी 50-100 रुपयांच्या नोटा दिल्या.
नोटबंदीमुळे दहा लाखांचा धनी, दहा हजारांसाठी हतबल
नेर शहरातीलच दुस-या एका वधूपित्यालाही नोटा रद्द झाल्याचा मोठा फटका बसला. नेर येथील बँकेत त्याचे दहा लाख रुपये जमा आहेत. मात्र लग्नाच्या खर्चासाठी आता तो पैसा त्याला बँकेतून काढणे कठीण जात आहे. दिवसभरात दहा हजारापेक्षा जास्त रक्कम काढणे मुश्कील झाले. या वधूपित्याला दहा हजारांसाठी रांगेत तास-न्-तास ताटकळत रहावे लागले. ही अवस्था त्याला इतकी छळणारी होती, की तो लोकांपुढेच रडला. शेवटी काही लोकांनी बँक व्यवस्थापकाला विनंती करून या वधूपित्याला दहा हजार रुपये मिळवून दिले.