ममता कुलकर्णीची पुन्हा चौकशी
By admin | Published: May 8, 2016 02:29 AM2016-05-08T02:29:11+5:302016-05-08T02:29:11+5:30
सोलापूरमध्ये अमली पदार्थांच्या कंपनीवर छापा टाकल्यानंतर चौकशीत दररोज नवी माहिती हाती लागत असून ड्रगमाफिया विकी गोस्वामीचे व्यवहार तपासण्यासाठी त्याची कथित पत्नी अभिनेत्री
- जितेंद्र कालेकर, ठाणे
सोलापूरमध्ये अमली पदार्थांच्या कंपनीवर छापा टाकल्यानंतर चौकशीत दररोज नवी माहिती हाती लागत असून ड्रगमाफिया विकी गोस्वामीचे व्यवहार तपासण्यासाठी त्याची कथित पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या वर्सोवा येथील घरी जाऊन गरज पडल्यास पुन्हा चौकशी केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. प्रकरणाच्या चौकशीसाठी एकूण सात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापुरातील एव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीतून पुनीत श्रींगी यानेच इफेड्रीनचा माल बाहेर काढल्याची माहिती कंपनीतील सात व्यवस्थापकांनी चौकशीत पोलिसांना दिली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एव्हॉनमधील सहा व्यवस्थापकांची चौकशी केली. त्यात कंपनीचे संचालक मनोज जैन यांनी पुनीतची सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानंतर बरेचसे इफेड्रीन बाहेर काढल्याची माहिती दिली. तो कोणत्याही वेळी कारमधून माल घेऊन जात होता. किशोर राठोड आणि जयमुखीमार्फत देशविदेशांत माल जात होता. किशोरमार्फत विकीपर्यंत माल गेल्याचे उघड झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणात किशोर आणि जयमुखींचा मोठा सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यांच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी सात पथकांची नियुक्ती केली आहे. सोलापूरमधूनच अहमदाबाद, इंदूर आणि ठाण्यातही माल गेल्याचे उघड झाले आहे. या तिन्ही ठिकाणच्या मालाच्या पडताळणीनंतर हे स्पष्ट झाले.
चौकशीसाठी ठाण्यात
ममता कुलकर्णीचा या प्रकरणाशी कितपत संबंध आहे, यासाठी पोलीस तिच्या घरी गेले होते. तेव्हा तिची भेट झाली नव्हती. आता गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी ठाणे पोलीस मुंबईत जातील किंवा तिला चौकशीसाठी ठाण्यात बोलवतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.