ममता कुलकर्णी आरोपी क्रमांक 14, दोन हजार कोटींची इफेड्रीन तस्करी
By Admin | Published: June 21, 2016 06:59 PM2016-06-21T18:59:01+5:302016-06-21T18:59:01+5:30
देश-विदेशात झालेल्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीची गणना आता यातील आरोपी क्रमांक 14 अशी झाली
जितेंद्र कालेकर
ठाणे, दि. 21- सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीतून देश-विदेशात झालेल्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीची गणना आता यातील आरोपी क्रमांक 14 अशी झाली आहे. केनियात झालेल्या इफेड्रीनच्या तस्करीत तिने चांगली भूमिका बजावल्यामुळे तिला एव्हॉनचे संचालक किंवा व्यवस्थापक पदही बहाल केले जाणार होते, अशी माहिती या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली.
ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणोकर नाटयगृहाजवळ दोन महिन्यांपूर्वी सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या दोघांना इफेड्रीनच्या तस्करीप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडील माहितीतूनच एव्हॉनचा संचालक मनोज जैन, व्यवस्थापक पुनित ङ्म्रींगी, नरेंद्र कांचा आदी दहा जणांना पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून अटक केली. तर एव्हॉनमधून अडीच हजार कोटींचा सुमारे 23 टन इफेड्रीन आणि सुडोइफेड्रीनचा साठाही पोलिसांनी हस्तगत केला. याच प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया विकी गोस्वामी आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचीही नावे तपासात उघड झाली. ममता, विकी, सुशील सुब्रमण्यम आणि तांजानियातील रहिवाशी डॉ. अब्दुल्ला हे चौघे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
एव्हॉनमधील इफेड्रीनची केनियासह इतर देशांमध्येही तस्करी करण्यासाठी ममता, मनोज जैन, जयमुखी, किशोर राठोड आणि विकी गोस्वामी यांच्यात वारंवार केनियामध्ये बैठका झाल्या. या बैठकांचे सबळ पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. ममताच्या ओशिवारा येथील दोन्ही सदनिकांच्या मेन्टनन्सचे पैसेही विकीकडून दिले जात होते. 8 जानेवारी 2क्16 मध्ये केनियात झालेल्या बैठकीतही ममता होती. इफेड्रीनच्या तस्करीपोटी हवालाद्वारे ममता, विकी, जयमुखी आणि जैन यांना करोडो रुपये मिळाल्याचे सबळ पुरावेही हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ममता आणि विकी हे केनियात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केनिया आणि भारत यांच्यात आरोपी प्रत्यार्पणाचा करार नाही. मात्र, रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर त्यांना कोणत्याही देशातून इतरत्र पळ काढता येणार नाही. कोणत्याही देशाच्या विमानतळावर ते आले तर इंटरपोलमार्फत त्यांची माहिती ठाणो आणि अमेरिकेच्या पोलिसांना मिळू शकणार आहे. त्यादृष्टीने आता ही रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त बी. के. शेळके यांनी लोकमतला दिली.