ममता कुलकर्णीची बँक खाती गोठवली, ९० लाखांची रक्कम सील
By admin | Published: July 28, 2016 08:43 PM2016-07-28T20:43:22+5:302016-07-28T20:43:22+5:30
विकी गोस्वामीला करोडो रुपयांच्या इफेड्रीनच्या देशविदेशांत तस्करीसाठी मदत केल्याचा आरोप असलेली ममता कुलकर्णी हिची भारतातील सर्व बँक खाती गोठवली आहेत
जितेंद्र कालेकर
ठाणे : आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया विकी गोस्वामीला करोडो रुपयांच्या इफेड्रीनच्या देशविदेशांत तस्करीसाठी मदत केल्याचा आरोप असलेली सिनेअभिनेत्री ममता कुलकर्णी हिची भारतातील सर्व बँक खाती ठाणे पोलिसांनी गोठवली आहेत. तिच्या बँक खात्यांमध्ये ८० ते ९० लाखांची रक्कम जमा असून ती आता सील केली आहे. तर विकी गोस्वामी, ममता, डॉ. अब्दुल्ला आणि त्याचा साथीदार अशा चौघांविरुद्ध रेड कॉर्नर नोटिशीची प्रक्रियाही सुरू केल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
आपण निर्दोष असल्याचा कांगावा प्रसारमाध्यमांमधून करणाऱ्या ममताविरुद्ध सर्व बाजूंनी ठोस पुरावे गोळा करण्यास ठाणे पोलिसांनी सुरुवात केली आहे. विकी, ममतासह चौघांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची प्रक्रिया गेल्या आठ दिवसांपासून सुरू झाली आहे. त्यासाठी तिच्या आणि विकीच्या नावावरील मालमत्तेची माहिती घेण्यात येत आहे. मुंबईतील वर्सोवा येथील तीन सदनिका आणि गोव्यातील काही मालमत्तेची माहिती तपासात उघड झाली आहे. विकी आणि ममताच्या मालमत्तेची माहिती घेण्यासाठी अहमदाबाद (गुजरात) आणि महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या महापालिका, तहसीलदार कार्यालय तसेच उपनिबंधक कार्यालयांकडे पत्राद्वारे माहिती मागवली आहे.
दोघांच्याही मालमत्तेची अधिकृत माहिती मिळाल्यानंतर ती न्यायालयात सादर केली जाणार आहे. त्यानंतर, तिचा जाहीरनामा काढून संबंधितांना न्यायालयातर्फे अटक वॉरंट काढले जाईल. त्याच वॉरंटच्या आधारे देशविदेशांतील सर्व विमानतळांवर त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडेही ठाणे पोलिसांकडून पत्रव्यवहार सुरू आहे.
........................
ममताच्या बँक खात्यांमध्ये ९३ लाख रुपये
विकी गोस्वामी आणि एव्हॉनचा संचालक मनोज जैन यांच्याबरोबर ८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या बैठकीत सामील असलेल्या ममताच्या भारतातील सर्व बँक खात्यांची चौकशी पोलिसांनी केली आहे. त्यातील एका खात्यातून विकी गोस्वामीची बहीण रीटाच्या खात्यामध्ये दोन कोटी वळते झाले आहेत. त्यावरूनच रीटाचीही पोलिसांनी चौकशी केली. अर्थात, तिनेही सर्व आरोपांचा इन्कार करून चांगली मैत्रीण असल्यामुळे व्यवसायासाठी आपल्याला ममताने हे पैसे दिल्याचा तिने दावा केला.
दरम्यान, ममताची मडापो (भूज, गुजरात), कालवाड रोड (राजकोट, गुजरात), बदलापूर (ठाणे, महाराष्ट्र) येथील अॅक्सिस बँकांच्या शाखांमध्ये २६ लाखांची रोकड आहे. तर, मालाड मुंबईच्या शाखेत एक लाख अमेरिकन डॉलर्स (६७ लाख रुपये भारतीय चलन) अशी सुमारे ९३ लाखांची रक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सर्व खाती आता पोलिसांनी सील केल्यामुळे ममता किंवा तिच्या कोणत्याही नातेवाइकाला तिथून पैशांचे व्यवहार करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.