"हॅलो, मी शरद पवार बोलतोय... बदलीचं तेवढं बघा"; मंत्रालयात आलेल्या 'त्या' फोन कॉलनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 06:55 AM2021-08-13T06:55:18+5:302021-08-13T06:55:38+5:30
पुण्यातून तिघांच्या आवळल्या मुसक्या
मुंबई : ‘हॅलो, मी शरद पवार बोलतोय... बदलीचं तेवढं बघा...’असा फोन मंत्रालयातील महसूल विभागात आला. एकच खळबळ उडाली. चौकशीत पुण्यातील दोघांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढत हा फोन केल्याचे समोर आले. पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आणखी एकाला अटक करण्यात आली.
नुकत्याच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्याच संदर्भात महसूल विभागातील सचिव स्तरावरील अधिकाऱ्याला बुधवारी हा फोन आला. फोन क्रमांक पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकमधून आल्याचे दिसत होते. त्यात, आरोपींनी शरद पवार यांच्या नावाचा वापर करून त्यांचा आवाज काढत बोलणे केले. खुद्द शरद पवार यांचा फोन आल्याने हा अधिकारी हडबडला. यावेळी एका अधिकाऱ्याच्या बदलीबाबत लक्ष देण्यास सांगण्यात आले. फोन ठेवल्यानंतर पवार यांचा दिल्ली दौरा सुरू असल्याचे अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यामुळे ‘सिल्वर ओक’मधून फोन कसा केला? या संशयातून त्यांनी तत्काळ तिकडे फोन करून चौकशी केली. तेव्हा असा कुठलाही फोन केला नसल्याचे समजले. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. खंडणी विरोधी पथकाच्या तपासात पुणे कनेक्शन समोर आले. याप्रकरणी विकास गुरव (५१), किरण काकडे (२६) आणि धीरज पठारे या तिघांना अटक करण्यात आली. तिघेही बेरोजगार असल्याचे समजते. त्यांनी असे का केले? याबाबत तपास सुरू आहे.