पत्नीला कोरोना लस देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 07:25 AM2021-07-09T07:25:49+5:302021-07-09T07:29:32+5:30
शहापुरातील गुजराथीनगर येथे राहणारे जगदीश शेट्टी (५१) हे गुरुवारी सकाळी ७च्या सुमारास शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पत्नीला लस मिळावी यासाठी रांगेत उभे होते. रांगेत उभे असताना ते अचानक खाली कोसळले.
शहापूर : पत्नीला कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या पतीला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी सकाळी घडली. जगदीश शेट्टी असे मृत व्यक्तीचे नाव असून, विशेष म्हणजे त्यांनीही एक दिवस अगोदर कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली होती.
शहापुरातील गुजराथीनगर येथे राहणारे जगदीश शेट्टी (५१) हे गुरुवारी सकाळी ७च्या सुमारास शहापूर उपजिल्हा रुग्णालयात पत्नीला लस मिळावी यासाठी रांगेत उभे होते. रांगेत उभे असताना ते अचानक खाली कोसळले. रुग्णालयात असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी दक्षता विभागात हलविले. मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, जगदीश यांनी एक दिवसापूर्वीच कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली होती, त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत आता परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शहापूर पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लसीच्या रांगेत प्रतीक्षा करताना नागरिकांना होणा-या त्रासाबाबतही तक्रारी करण्यात येत आहेत.