खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचाय - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 05:23 PM2019-12-10T17:23:33+5:302019-12-10T17:25:09+5:30
या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुंबई - राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या कुलाबा येथील कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी ज्या ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील असे आश्वसन देऊन आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असा संदेश ठाकरे यांनी पोलीस दलाला दिला.
सर्वसामान्य नागरिकाला पोलीसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, काही वेळा न्याय्य मागण्यांसाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावित. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. पोलीसांमुळे नागरिकांचे सण- उत्सव आनंदात पार पडतात, असेही पोलिसांबद्दल गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. पोलीसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्यकालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू असे देखील ठाकरे म्हणाले.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क रहावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या. या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी तसेच परिक्षेत्रांच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. सुरुवातीला पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज पोलिस महासंचालक कार्यालय येथे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 10, 2019
यावेळी त्यांनी निर्भया फंड मधील निधीचा विनियोग करण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचना केल्या.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 10, 2019
पोलिसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न तसेच पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर केल्यास त्याला तत्काळ मान्यता देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 10, 2019
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी पुणे, ठाणे, औरंगाबाद (संभाजीनगर), नागपूर, नाशिक, नवी मुंबई पोलिस आयुक्त तसेच विशेष पोलिस महानिरीक्षकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 10, 2019
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रती क्विंटल ५०० रुपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 10, 2019