कौटुंबिक वादातून जावयाने केली सासरा, पत्नी व मेव्हण्याची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 09:45 AM2018-05-17T09:45:47+5:302018-05-17T12:16:42+5:30
बाळापूरातील आझादनगर भागात जावयाने सासरा, पत्नी आणि मेव्हण्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
बाळापूर - पत्नीला नांदायला पाठवत नसल्याचा रागातून संतापलेल्या जावयाने सासरा,मेव्हण्यासह पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उशिरा रात्री अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरात घडली. गेल्या काही दिवसापासून पत्नी माहेरी होती.तिला तिचे आई-वडील व भाऊ पतीसोबत नांदायला पाठवत नाही या कारणावरून पतीने सासरा,मेव्हणा व पत्नीला चाकुने भोसकून ठार केले. याप्रकरणी बाळापुर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपी सै.फिरोज से रज्जाक हा बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा-पारंडा येथील रहिवाशी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याची पत्नी त्याच्याकडे राहत नव्हती.तिचे आई-वडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते.अनेक दिवसांपासून पत्नी माहेरी असल्याने आरोपी बाळापूरात येऊन वाद घालत होता.हाच राग अनावर होत आरोपी जावयाने शेख महेबुब(वय-65,सासरा),महंमद फिरोज (वय-27,मेव्हना),शबाना परविन(वय-30,पत्नी)हिला ठार मारले,अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.
आरोपीला दोन मुली आहेत (एक सात वर्षांची तर दुसरी पाच वर्षांची) दोन्ही मुली आरोपीकडे राहत होत्या. बुधवारी संध्याकाळी तो मुलींना घेऊन सासरी आला होता .यावेळी त्याने सोबत चाकू व पेट्रोल आणले होते. त्याच्यासोबत पत्नीला पाठवत नसल्याचे सासरच्यांनी सांगितल्यानंतर त्याने सासरा,पत्नी व मेव्हण्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात तिघांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती बाळापुर पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार विनोद ठाकरे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले.यावेळी आरोपी घटनास्थळीच बसून होता.आपण पोलिसांचीच वाट पाहत आहोत,असेही त्याने सांगितले.याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.