पती-पत्नीची भांडणं सोडवायला गेलेल्या गरोदर मेहुणीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2018 10:27 AM2018-05-18T10:27:59+5:302018-05-18T10:33:20+5:30
गरोदर मेहुणीचा बहिणीच्या नवऱ्यासह एका अल्पवयीन आरोपीने लोखंडी फुकणीने मारहाण करून ढकलून देत हत्या केल्याची घटना घडली आहे.
पिंपरी-चिंचवड (वाकड) : किरकोळ कारणावरून पती- पत्नीचे भांडणे सोडवायला गेलेल्या गरोदर मेहुणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. बहिणीच्या पतीने व आणखी एका व्यक्तीने पीडित महिलेची लोखंडी फुकणीने मारहाण करून हत्या केली. मारहाणीनंतर तिला ढकलूनही देण्यात आलं. गुरूवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली.
मुन्नीबाई देवा जाधव (वय २५) असे हत्या करण्यात आलेल्या मेहूणीचं नाव असून या हाणामारीत आरोपीची पत्नी लक्ष्मी हिरा चव्हाण (वय २५) ह्या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी देवा खेमु जाधव (वय ३०, रा गुड्डूभाऊ चाळ भुंडेवस्ती, बावधन) यांनी फिर्याद दिली असून हिरा देवू चव्हाण (वय ३०, रा. सरकारी शाळेजवळ लमाण तांडा, संजय गांधी वस्ती, पाषाण) याच्यासह एका अल्पवयीनाला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हिंजवडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांनी दिलेली माहिती अशी आरोपी हिरा चव्हाण व त्याची जखमी पत्नी लक्ष्मी चव्हाण यांचे गुरुवारी भांडणे झाली त्याचे पर्यसन हाणामारीत झाले. बहिणीला पती मारत असल्याचे पाहून गरोदर असलेल्या मुन्नीबाई आपल्या बहिणीला वाचविण्यासाठी मध्ये पडल्या एवढ्यात १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीने लोखंडी फुकणीने मुन्नीबाईच्या डाव्या गालाखाली जोरदार प्रहार केला तर दाजी असलेल्या हिराने धक्काबुक्की करीत तीला जोरात ढकलून देत गंभीर जखमी केले. या मारहाणीत मुन्नीबाई व तिच्या पोटातीला बाळाला मृत्यू झाला.