मोफत पाणीपुरवठा करून भागवली जातेय नागरिकांची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:01 PM2018-03-08T12:01:54+5:302018-03-08T12:01:54+5:30
साधारणत: १७०० लोकसंख्या असलेल्या पिंप्री अवगन येथे सध्या पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही.
शेलुबाजार (वाशिम) - गावातील पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न म्हणून मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री अवगन येथील बाबाराव महादेव अवगन यांनी स्वत:च्या दोन बोअरवेलवरून मोफत पाणीपुरवठा सुरू केला. यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साधारणत: १७०० लोकसंख्या असलेल्या पिंप्री अवगन येथे सध्या पाणीपुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही. काही वर्षांपूर्वी येथे दुधाळा पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा होत असे. मात्र, सदर योजना बंद पडली. २००७ ते २००९ या दरम्यान टँकरने पाणीपुरवठा करून पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात आला. त्यानंतर टँकरही बंद झाले. आता मिळेल तेथून पाणी आणून गावकºयांना तहान भागवावी लागत आहे. सध्या पिंप्री अवगन येथे तिव्र पाणीटंचाई असून गावातीलच बाबाराव अवगन यांनी स्वत:च्या बोअरवेलवरून मोफत पाणीपुरवठा सुरू केला. या परिसरातील नागरिक दररोज सकाळ, दुपार व सायंकाळच्या वेळी येथून पाणी भरतात. पाणीटंचाईच्या काळात पाणी विकण्याचा व्यवसाय न थाटता अवगन यांनी मोफत पाणीपुरवठा करून इतरांसमोर आदर्श निर्माण केला.