मनोर महामार्गाची डागडुजी-शिंदे

By Admin | Published: August 25, 2016 03:05 AM2016-08-25T03:05:10+5:302016-08-25T03:05:10+5:30

सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हुतात्मा चौकात २२ आॅगस्टपासून सुरु केलेले उपोषण बुधवारी मागे घेण्यात आले.

Manad Highway's Repair-Shinde | मनोर महामार्गाची डागडुजी-शिंदे

मनोर महामार्गाची डागडुजी-शिंदे

googlenewsNext


पालघर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालघर जिल्हा प्रशासनाने मनोर वाडा भिवंडी रस्त्याची डागडुजी आणि इतर दुरावस्थे संदर्भात ठोस कारवाई करण्याचे मान्य केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हुतात्मा चौकात २२ आॅगस्टपासून सुरु केलेले उपोषण बुधवारी मागे घेण्यात आले.
वनविभागाच्या परवानगीच्या नावाखाली सुप्रीम कंपनीने आजवर रस्त्याचे अपूर्ण ठेवलेले काम तात्काळ सुरु करण्यात येईल. प्रस्तावित कामातील उड्डाणपूल ,गटारे ,विद्युत खांब हटविणे आदी कामे तात्काळ सुरु करून पूर्ण करण्यात येतील त्याच बरोबरीने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला आजवर ज्यांना मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला दिला जाईल तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले असून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. दक्षता व गुणवत्ता पथकाने दिलेल्या अहवालावर कार्यवाही करण्याचेही सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मान्य केले आहे .
मनोर वाडा भिवंडी रस्त्यादरम्यानचे काही जुने पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीस धोकादायक बनल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले असून या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येत आहेत. तसेच सुप्रीम कंपनीने गौण खनिजाच्या स्वामित्व धनाची रक्कम महसूल विभागाकडे जमा केलेली नसल्यास येत्या काही दिवसात या संबंधीची खातरजमा करून सदर रक्कम वसूल करून घेण्याच्या दृष्टीने महसूल विभाग तात्काळ कार्यवाही करेल असे आश्वासन महसूल विभागाने दिले आहे.
या मार्गावर चालू असलेले दोन टोल नाके बंद करण्याची प्रमुख मागणी शासनस्तरावरील असल्याने या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा प्रशासना मार्फत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याचेही आश्वासन देण्यात आले आहे .
सुप्रीम इन्फ्रा. प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने मनोर वाडा भिवंडी रस्त्याचे काम अपूर्ण असतांनाही या रस्त्यासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या दिलेल्या अहवालाच्या आधारे दोन टोल नाके उभारण्यास शासनाने दिलेली परवानगी, प्रस्तावित रस्त्याची अपूर्ण कामे, उड्डाणपूल न उभारणे, शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला न देणे तसेच खराब रस्त्यामुळे तीन वर्षात या रस्त्याने घेतलेले १४१ जणांचे बळी हे मुद्दे घेऊन निलेश सांबरे व त्यांचे सहकारी २२ आॅगस्ट पासून पालघर येथे उपोषणास बसलेले होते. या उपोषणादरम्यान वाडा भिवंडी विक्रमगड पालघर या सर्व भागातून व स्तरातून धाव घेऊन उपोषणास पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याची दखल शासन व प्रशासनाला घेणे क्रमप्राप्त ठरले. मंगळवारी तहसीलदार महेश सागर,नायब तहसीलदार खटके व बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश काटकर यांनी उपोषण कर्त्यांशी चर्चा केली व ठोस असे आश्वासन मिळाल्यानंतरच हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रचंड प्रतिसाद लाभलेल्या या उपोषणाला माजी खासदार बळीराम जाधव, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आमदार विलास तरे,आ.अमित घोडा,आ.रामदास मोते,आ.शांताराम मोरे, बहुजनचे प्रशांत पाटील, काँग्रेसचे मनीष गणोरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. या आंदोलनाच्या यशामुळे हा महामार्ग सुस्थितीत येण्याबाबतच्या परिसरातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)
>जनतेच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी हे उपोषणाचे अस्त्र उगारले गेले असतांना व त्याला व्यापक पाठिंबा मिळत असतांनाही जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांना उपोषणकर्त्यांची साधी भेटही घ्यावीशी वाटली नाही याबद्दल आंदोलकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या.

Web Title: Manad Highway's Repair-Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.