आगारांमधील कारभार हा रामभरोसे
By admin | Published: July 18, 2016 03:20 AM2016-07-18T03:20:50+5:302016-07-18T03:20:50+5:30
कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांकडे लक्ष देणारा सक्षम अधिकारी नसल्याने येथील कारभार हा रामभरोसे सुरू आहे
ठाणे- कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांकडे लक्ष देणारा सक्षम अधिकारी नसल्याने येथील कारभार हा रामभरोसे सुरू आहे. कार्यशाळा व्यवस्थापकाचे पद परिवहन सुरू झाल्यापासून भरलेच गेलेले नाही. तीच परिस्थिती उपव्यवस्थापकाची. सहायक कार्यशाळा अधिकारी-०२, सहायक कार्यशाळा अधीक्षकाची महासभेने १२ पदे मंजूर केली होती. परंतु, सरकारमान्य पदे ८ असून तीन पदे आजही रिक्त आहेत.
प्रमुख मेकॅनिकची महासभेची १२ पदे मंजूर असून सरकारमान्य ९ पदे असून त्यातील ५ पदे रिक्त आहेत. वाहन तपासणीसच्या बाबतीतही १२ महासभेची, सरकारमान्य केवळ ३ असून त्यातील केवळ १ पद भरण्यात आले असून दोन पदे रिक्त आहेत. मेकॅनिक दर्जा-१ ची ६, आॅटो इलेक्ट्रिशिन १, असिस्टंट आॅटो इलेक्ट्रिशियन १, मदतनीस २५, अशी एकूण महासभेने मंजूर केलेल्या
३७० पदांपैकी २७५ पदे भरली असून केवळ कार्यशाळेतील ४६ पदे रिक्त आहेत.
दुसरीकडे एकूणच परिवहनमध्ये अ आणि ब विभागात मोडणारी अन्य ४०० पदे रिक्त असून अ विभागातील परिवहन व्यवस्थापक वगळता, उपव्यवस्थापक, लेखापाल, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक, मराठी लघुटंकलेखक, कनिष्ठ टंकलेखक, द्वारपाल, सुरक्षारक्षकांची १४ पदे अशी एकूण अ विभागात मोडणारी १४५ पैकी ४३ पदे रिक्त आहेत. तर, ब विभागात म्हणजेच वाहतूक विभागात आगार व्यवस्थापक १, वाहतूक निरीक्षक ३, सहायक वाहतूक निरीक्षक १२, वाहतूक नियंत्रक ३, चालक १८२ आणि वाहक १५५ अशा एकूण २१७७ पदांपैकी ३५७ पदे रिक्त आहेत.
>कार्यशाळेला गळती
कार्यशाळेतील गिअर, युनिट, टायर विभागांसह इतर विभागांना सध्या गळती लागली आहे. कार्यशाळेच्या गिअर बॉक्स विभागाला जे प्लास्टिकचे छत टाकले आहे. त्याचे बाम्बू कमकुवत झाले आहेत. थोडा पाऊस झाला तरी पाणी तेथील साहित्यावर पडत असून या साहित्यालाही गंज पकडू लागला आहे. तसेच थ्री-फेजची लाइन येथून गेली असल्याने येथे शॉर्टसर्किटची शक्यताही नाकारता येत नाही. तरीसुद्धा आपला जीव मुठीत धरून हे कर्मचारी काम करीत आहेत. तसेच येथे महावितरणचा डीपी असून त्यावरील छपरालादेखील गळती लागली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचीही पडझड झाली असून येथील अनेक ठिकाणचे स्लॅब पडण्याच्या स्थितीत आहेत.
कार्यशाळेबरोबर इतर कर्मचाऱ्यांना बढती नाही
कार्यशाळा आणि इतर विभागांत २२ वर्षांपासून कर्मचारी कार्यरत असून त्यांना अद्याप बढती दिलेली नाही. कार्यशाळेत १५० च्या आसपास कर्मचारी असून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमुळे येथे आजही ४५ कर्मचाऱ्यांची वानवा आहे.
चालक, वाहकांची संख्या कमी
परिवहनचा गाडा रुळांवर आणण्यासाठी चालक आणि वाहकही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु, परिवहनची सध्याची परिस्थिती पाहता सध्या उपलब्ध असलेल्या चालक आणि वाहकांना पहाटेच्या वेळेस बससाठी १ ते २ तास वाट पाहावी लागते. चालक, वाहकांच्या भरतीसाठी १० वर्षांपूर्वी प्रयत्न झाला होता. परंतु, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने परिवहनने पुन्हा नव्याने भरतीसाठी पावलेच उचलली नाही.
-परिवहन सेवचा बट्ट्याबोळ हा प्रशासनानेच केला असून तेच परिवहन सेवा डबघाईत घालण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे परिवहन नाही तर आता प्रशासनदेखील भंगारात टाकण्याची वेळ आली आहे.
- राजेश मोरे, परिवहन समिती सदस्य
>जीव धोक्यात घालून कर्तव्यपालन
टीएमटीच्या आगारांतील दृश्य पाहिल्यास येथे माणसे काम करतात, याचा प्रशासनाला विसर पडला आहे. दुर्गंधी, डास, अस्वच्छता यांचा त्रास सहन करत कर्मचारी काम करत आहेत. इमारतीची झालेली दुरवस्था, ठिबक सिंचन यामुळे येथील कर्मचारी जीव मुठीत धरून आपले कर्तव्य बजावत आहेत.