तुम्हीच एखाद्याला उभं करायचं अन्...; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:43 PM2024-02-27T12:43:01+5:302024-02-27T12:44:05+5:30
नरेंद्र मोदींवरही आम्ही पंतप्रधान म्हणून टीका करतो. व्यक्तिगत टीका केली नाही असंही संजय राऊतांनी सांगितले.
मुंबई - Sanjay Raut on Eknath Shinde ( Marathi News ) मर्यादेच्या बाहेर गेले की करेक्ट कार्यक्रम कुणाचा होतो हे जसं राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, तसं जनतासुद्धा मर्यादेबाहेर गेलेल्या लोकांचा कार्यक्रम २०२४ च्या निवडणुकीत करणार आहे. या राज्यात सगळ्याच गोष्टी मर्यादेच्या बाहेर गेल्या आहेत. तुम्हीच एखाद्याला उभं करायचे आणि मर्यादेबाहेर गेल्यावर करेक्ट कार्यक्रमाची भाषा करायची. पण आम्हाला या सर्व विषयांत पडायचं नाही. महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केलेत.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ बिघडता कामा नये. पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लागू नये. महाराष्ट्रात भाषा बिघडलेली आहे त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर राज्याची भाषा आणि संस्कृती पूर्णपणे बिघडायला सुरुवात झाली. जी भाषा जरांगे पाटील यांनी गृहमंत्री फडणवीसांबाबत वापरली त्याचे कुणीही समर्थन करणार नाही पण भाजपाचे काही भाडोत्री लोक विरोधी पक्षातील नेत्यांबाबत ज्या भाषेचा प्रयोग करतात त्याचे समर्थन फडणवीस आणि करेक्ट कार्यक्रम करणारे करणार आहेत का असा सवालही त्यांनी विचारला.
तसेच तुम्ही हवी ती भाषा वापरायची आणि तुमच्यावर कुणी अशा भाषा वापरली तर तुम्हाला ती टोचते. नारायण राणे आणि त्यांची मुले कुठली भाषा वापरतात? भाजपा आणि शिंदे गँगचे काही लोक कुठल्या प्रकारची भाषा वापरतात, आज मराठी भाषा दिनानिमित्त त्यांनी आत्मचिंतन करावे. त्यातून मराठी भाषा शुद्ध होईल. टीका आम्हीही करतो, प्रखर करतो, आम्ही व्यक्तिगत टीका करत नाही. राजकीय भूमिकांवर टीका करतो. नरेंद्र मोदींवरही आम्ही पंतप्रधान म्हणून टीका करतो. व्यक्तिगत टीका केली नाही असंही संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, राज्य कायद्याचे आहे. सरकारवर वाटत असेल एखाद्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होतंय तर सरकारला कारवाईचा अधिकार आहे. पण ही वेळ महाराष्ट्रावर कुणी आणि का आणली? याची चौकशी केली पाहिजे. आजही मराठा समाजाला आपली फसवणूक झालीय असं का वाटते? त्यातून हा उद्रेक सुरू असेल, गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात जातीजातीत आग लावण्याचं काम कुणी केले, हे राज्य आधी कधी असं नव्हते. हे भाजपाचे राजकारण आहे. महाराष्ट्रात जातीजातीत, पोटजातीत इतका कधीच दुभंगला नव्हता अशी टीकाही संजय राऊतांनी भाजपावर केली.