मणप्पुरम गोल्ड चोरीचे झारखंड कनेक्शन!
By admin | Published: January 3, 2017 04:52 AM2017-01-03T04:52:46+5:302017-01-03T04:52:46+5:30
मणप्पुरम फायनान्सच्या उल्हासनगर शाखेमध्ये झालेल्या ३२ किलो सोनेचोरी प्रकरणाचे धागेदोरे झारखंडपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे : मणप्पुरम फायनान्सच्या उल्हासनगर शाखेमध्ये झालेल्या ३२ किलो सोनेचोरी प्रकरणाचे धागेदोरे झारखंडपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाणे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली असून, पोलिसांचे एक पथक झारखंडसाठी रवाना होत आहे.
मणप्पुरम फायनान्सच्या उल्हासनगर येथील गोल्ड लोन शाखेमधून ३२ किलो सोने चोरी झाल्याची घटना २७ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संशयिताच्या चौकशीतून पोलिसांना आरोपीचा सुगावा लागला आहे. इमारतीचा सुरक्षारक्षक पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताच्या संपर्कात होता, हे स्पष्ट झाले आहे. घटनेच्या पूर्वी आणि नंतर त्यांनी एकमेकांना किती फोन केले, याचाही तपशील मिळाला असून, सुरक्षारक्षकाचा मोबाइल बंद असल्याने तपास यंत्रणा अद्याप त्याच्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही.
संशयित सुरक्षारक्षकाबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तो झारखंड किंवा नेपाळमध्ये असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगाने तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट १ चे पथक मंगळवारी झारखंडसाठी रवाना होत आहे. या इमारतीचा माजी सुरक्षारक्षक हा संशयित आरोपीचा नातलग असून, या चोरीतील त्याची भूमिकाही पोलीस तपासून पाहात आहेत. (प्रतिनिधी)