मनश्रीच्या अपहरणकर्तीचे रेखाचित्र जारी
By Admin | Published: June 26, 2016 01:20 PM2016-06-26T13:20:47+5:302016-06-26T13:20:47+5:30
जिल्ह्यातील अकोटच्या जिजामाता नगरातून अपहरण करण्यात आलेल्या मनश्रीची शोधमोहीम सुरूच आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी हिवरखेड येथील दुकानातील सीसी टीव्हीचे फुटेज २५ जून रोजी पोलिसांनी तपासले
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २६ : जिल्ह्यातील अकोटच्या जिजामाता नगरातून अपहरण करण्यात आलेल्या मनश्रीची शोधमोहीम सुरूच आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलीसांनी हिवरखेड येथील दुकानातील सीसी टीव्हीचे फुटेज २५ जून रोजी पोलिसांनी तपासले; परंतु काही निष्पन्न होऊ शकले नाही. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दिलेल्या माहितीच्या आधारे मनश्रीचे अपहरण करणाऱ्या महिलेचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे.
अकोट येथील सीतला माता मंदिरात सवंगड्यांसेबत खेळताना संतोष लाकडे यांच्या साडेपाच वर्षीय मनश्री या बालिकेचे एका अज्ञात महिलेने चॉकलेट देण्याचे आमिष देऊन २४ जून रोजी अपहरण केले. मनश्री सोबत खेळत असलेल्या सवंगड्यांनी सदर महिलेचे वर्णन पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांनी व नातेवाइकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली.
सोशल साईटवरदेखील मनश्रीचा फोटो व वर्णन व्हायरल करण्यात आले, तसेच पोलिसांनी नाकाबंदीही केली; पण पोलिसांना तिचा थांगपत्ता लागला नाही. दुसरीकडे मनश्रीचे वडीलसुद्धा मध्यप्रदेशात आपल्या मुलीच्या शोधासाठी गेले आहेत. मनश्रीच्या वडिलांची परिस्थिती गरिबीची असून, तिच्या घरी आईसह सर्वजण चिंंताग्रस्त झाले आहेत.
दरम्यान, मनश्री हरविल्याची सचित्र माहिती सार्वजनिक करण्यात आली असून, मनश्री कुठेही आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान दोन दिवस उलटूनही मनश्रीच्या अपहरणाचे कारण गुलदस्त्यात आहे