नरेंद्र मोदींना मिळालेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीसाठी मंगलप्रभात लोढांनी लावली 51 लाखांची बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:35 PM2021-10-05T19:35:41+5:302021-10-05T19:37:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या 1300 भेटवस्तुंचा ई-लिलाव होत आहे.
मुंबई:काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्या दौऱ्यात पंतप्रधानांना अनेकांनी मौल्यवान भेटवस्तू दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा त्यांना मिळालेल्या भेटवस्तुंचा लिलाव केला आहे. आता पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तुंचा लिलाव होत आहे.
Https://pmmementos.gov.in या वेब पोर्टलवर 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव होत आहे. या लिलावात टोकियो 2020 पॅरालिम्पिक गेम्स आणि टोकियो 2020 ऑलिम्पिक गेम्सच्या विजेत्यांनी पंतप्रधानांना दिलेली क्रीडा उपकरणे आणि आणि इतर भेटवस्तुंचा समावेश आहे. यासय, विविध कलाकृतींमध्ये अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती, चारधाम, रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर, मॉडेल, शिल्प, चित्रे यांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या या टप्प्यात सुमारे 1330 स्मृतिचिन्हे ई-लिलाव केली जात आहेत.
मंगलप्रभात लोढांनी लावली 51 लाखांची बोली
या लिलावात भाग घेत मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी अयोध्या राम मंदिराच्या प्रतिकृतीसाठी 51 लाख रुपयांची बोली लावली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक बोली आहे. लांबी - 68 (सेमी), रुंदी - 52 (सेमी), उंची - 53 (सेमी) आणि वजन - 23 (किलो) असलेली अयोध्या राम मंदिराची ही प्रतिकृती लाकडापासून बनलेली आहे. याबाबत बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्वांना ई-लिलावाद्वारे देशाच्या सेवेत योगदान देण्याची आणखी एक संधी दिली आहे, त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.