माणगाव-भादाव पूल मोडकळीस
By admin | Published: July 11, 2017 03:44 AM2017-07-11T03:44:55+5:302017-07-11T03:44:55+5:30
माणगाव काळ नदीवर वसलेला भादावचा पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल १९७० मध्ये काळ प्रकल्पाने बांधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : माणगाव काळ नदीवर वसलेला भादावचा पूल म्हणून ओळखला जाणारा हा पूल १९७० मध्ये काळ प्रकल्पाने बांधला. जवळपास ४६ वर्षांहून अधिक काळ झाला असून या पुलाचे कठडे तुटून पूल मोडकळीस आला आहे. या पुलाकडे काळ प्रकल्प खात्याने त्वरित लक्ष देऊन नव्याने बांधावा, अशी मागणी भादाव ग्रामस्थांनी केली आहे.
या पुलाची आयुमर्यादा आता संपली असून तो पूल पूर्णपणे मोडकळीस आला आहे. या पुलाची अवस्था गंभीर बनली असून केव्हाही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या पुलाला चिरा-भेगा पडलेल्या असून पुलाला गळती लागली आहे. या पुलावरून केवळ दुचाकी वाहनांना जाण्यासाठी परवानगी असून तीन किंवा चारचाकी वाहनांना जाण्यासाठी बंदी आहे. हा पूल मजबूत किंवा नवीन झाल्यास भादाव ग्रामस्थांना व माणगावकरांना सोयीचे ठरणार आहे. हा पूल नव्याने बांधल्यास भादाव ग्रामस्थांचा तीन कि.मी. अंतर कमी होणार आहे. शिवाय ग्रामस्थांचा पैसा व वेळ वाचून शालेय विद्यार्थ्यांनाही ते खास सोयीचे ठरणार आहे. हा पूल कमकुवत झाला असल्याने सद्यस्थितीत भीतीचे वातावरण असून पूल कधीही कोसळण्याची शक्यता आहे. जीव मुठीत धरून ग्रामस्थ या पुलावरून प्रवास करीत आहेत.
काळ प्रकल्प खात्याने अंदाजपत्रक तयार केलेले आहे. मात्र अद्याप निधीअभावी काम सुरू झाले नाही. आज या पुलाची अवस्था अत्यंत गंभीर बनली असून या पुलाकडे काळ प्रकल्प खात्याने लक्ष देऊन हा पूल मजबूत अथवा नव्याने करावा, अशी मागणी भादाव ग्रामस्थांनी केली आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी न लागल्यास काळ प्रकल्प खात्यावर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
काळ प्रकल्पाअंतर्गत हा पूल येत असून सध्या या पुलाची अवस्था बिकट आहे. या पूल दुरु स्तीचे अंदाजपत्रक वरील कार्यालयात मान्यतेसाठी पाठविले आहे. तसेच आमचे ठाणे येथील अधीक्षक अभियंता लोहार यांनाही या पुलाची माहिती दिली असून येथे भेट सुद्धा दिली आहे. लवकर प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर पुलाचे काम सुरू होईल.
- श्वेता पाटील,
सहा.कार्यकारी अभियंता,
काळ प्रकल्प माणगाव