मांगेली धबधबा हाऊसफुल्ल--आंबोलीतही गर्दी

By admin | Published: June 28, 2015 11:08 PM2015-06-28T23:08:32+5:302015-06-29T00:24:46+5:30

वर्षा पर्यटन : पर्यटकांनी लुटला मनमुराद आनंद

Mangeley Falls Waterfalls - Amboli too crowd | मांगेली धबधबा हाऊसफुल्ल--आंबोलीतही गर्दी

मांगेली धबधबा हाऊसफुल्ल--आंबोलीतही गर्दी

Next

कसई दोडामार्ग : आंबोली इतकाच निसर्गरम्य असलेला मांगेली येथील धबधबा वर्षा पर्यटनासाठी सज्ज झाला असून, रविवारी सायंकाळी हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. मद्यधुंद पर्यटकांना आवर घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक युवकांनी पार्किंगची व्यवस्था चांगल्या प्रकारे केल्याने पर्यटकांना कोणताही त्रास झाला नाही. धबधब्याचा आनंद पर्यटकांनी मनमुराद लुटला. शेकडोच्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली होती.
आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मौजमस्ती करण्यासाठी तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथील धबधब्याच्या ठिकाणी सकाळपासूनच पर्यटक येण्यास सुरुवात झाली.
या धबधब्याच्या ठिकाणी जाताना खोक्रल ते मांगेली फणसवाडी दरम्यान संपूर्ण डोंगराळ भाग असून वाटेत ठिकठिकाणचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहीत करते. या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत मांगेलीत दाखल झालेल्या पर्यटकांनी धबधब्याच्या धारांमध्ये स्रान करण्याचा आनंद मनोसोक्तपणे लुटला. यामध्ये सिंधुदुर्गसह कर्नाटक, गोवा या राज्यातील पर्यटकांची संख्याही मोठी होती. रस्त्यावर ठिकठिकाणी पर्यटक मौजमजा करताना दिसत होते.
धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास पर्यटकांना कोणताही अडथळा होऊ नये, वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी स्थानिंकांनी पार्किंगची सोय केली आहे. प्रत्येक वाहनामागे ठराविक रक्कम घेऊन पार्किंगची सोय केल्याने शेकडो वाहनांची वर्दळ असूनही त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. हजारो पर्यटकांच्या उपस्थितीमुळे हे पर्यटन स्थळ पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले होते. (वार्ताहर)


‘त्या’ पर्यटकांना वेळीच आवर घाला
याठिकाणी येणारे काही मद्यधुंद पर्यटक धिंगाणा घालतात. रस्त्याच्या कडेला दारूच्या बाटल्या घेऊन बसतात. दारू पिऊन झाली की दारूच्या बाटल्या तेथेच फोडतात. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी काचांचा सडा पडलेला असतो. काही मद्यधुंद पर्यटक येथील स्थनिक लोकांनाही त्रास देतात. महिलांची छेड काढण्याचेही प्रकार घडतात. शनिवार, रविवारबरोबरच इतर दिवशीही पर्यटक येथे येत असल्याने शाळकरी, महाविद्यालयीन मुली तसेच महिलांना फिरणे धोकादायक झाले आहे. अशा पर्यटकांना वेळीच आवर घाला, अशी मागणी मांगेली तळेवाडी, फणसवाडी येथील ग्रामस्थांनी केल्यानंतर त्यानुसार याठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंबोलीतही गर्दी
आंबोली : आंबोलीत रविवारी सुमारे दहा हजार पर्यटकांनी हजेरी लावली होती. मुख्य धबधबा, हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेव गड पॉर्इंट, कावळेशेत पॉर्इंट याठिकाणी पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. वर्षा पर्यटनाचा पहिलाच रविवार हाऊसफुल्ल झाला होता. मात्र, प्रशासनाच्या त्रुटी पुन्हा एकदा यावेळी दिसून आल्या. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या एकंदरीत सुखसुविधा विषयीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. वाहतूक पोलीस भलतीकडे उभे राहून क ोणती वाहतूक कोंडी सोडवित होते, असा प्रश्न निर्माण झाला होता. तर पंधरा पोलिसांची कुमक अतिशय तुटपुंजी पडत होती. ठिकठिकाणी मद्यपी राजरोसपणे मद्यपान करून धिंगाणा घालत होते. तर धबधब्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यात आली होती.
सहाचाकी अवजड वाहने, मोठे कंटेनर, ट्रक यांना बंदी असतानाही येत-जात होते. कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नाही की कोणतीही शिस्त नाही. पालकमंत्र्यांनी केलेल्या सर्व सूचनांना प्रशासनाने सपशेल ठेंगा दाखविल्याचे यावेळी स्पष्ट दिसत
होते. (वार्ताहर)

Web Title: Mangeley Falls Waterfalls - Amboli too crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.