रुग्णावर उपचार करणाऱ्या मांत्रिकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 09:14 PM2018-03-15T21:14:13+5:302018-03-15T21:14:13+5:30
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात संध्या गणेश सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मांत्रिकास बोलावून त्यांच्यावर उतारा केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णावर उतारा करणाऱ्या मांत्रिकाला अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण हा अजूनही फरार आहे.
सचिन सदाशिव येरवडेकर (वय ४८, रा. ३०६, कसबा पेठ) असे पोलीस कोठडी सुनावलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. अंद्धश्रद्धेला चालना दिल्या प्रकरणी डॉ. चव्हाण याच्यावरही गुन्हा दाखल आहे. संध्या गणेश सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय २२, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २० फेब्रुवारी ते ११ मार्च २०१८ या कालावधीत स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली. संध्या यांच्या छातीमध्ये दुधाच्या गाठी झाल्या होत्या. त्या काढण्याची शस्त्रक्रिया डॉ. सतीश चव्हाण याच्या चव्हाण नर्सिंग होममध्ये करण्यात येते होते. हे आॅपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला.
मात्र, त्यापूर्वी संध्या या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात असताना सकाळी ७ ते साडेआठ ही वेळ यमाची घंटा आहे, असे सांगून त्यांच्या कुटुंबियांना शस्त्रक्रिया करण्यापासून परावृत्त करण्यात आले. बरे होण्यासाठी संध्या यांना मंत्र पठण करण्यास सांगितले. मांत्रिकास बोलावून त्यांच्यावर उतारा केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. सतीश चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याचा व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियम २०१३ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये येरवडेकर याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी मुख्य आरोपी डॉ. सतीश चव्हाण याच्या शोधासाठी आणि येरवडेकर मांत्रिक आहे. त्याने अशा प्रकारचे अन्य गुन्हे केले आहेत का, याच्या शोधासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली.