आंबा, काजू महामंडळाला जुलैपर्यंत निधी

By admin | Published: April 26, 2015 10:13 PM2015-04-26T22:13:23+5:302015-04-27T00:11:43+5:30

दीपक केसरकर : रखडलेल्या प्रकल्पांना सर्वाधिक प्राधान्य

Mango and cashew corporation funds till July | आंबा, काजू महामंडळाला जुलैपर्यंत निधी

आंबा, काजू महामंडळाला जुलैपर्यंत निधी

Next

चिपळूण : राज्यातील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. काही प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती पाहता त्याचे नियोजन करून प्रथम रखडलेल्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार आहे. अत्यंत महत्त्वाचे, महत्त्वाचे असे वर्गीकरण करुन ते प्रकल्प मार्गी लावले जातील. तसेच कोकणसाठी निर्माण केलेला आंबा व काजू महामंडळाला जुलैपर्यंत निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असा विश्वास अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
चिपळूण येथे वैश्य समाज बांधवांच्या मेळाव्यात वित्त राज्यमंत्री दिपक केसरकर यांचा सत्कार समाजाच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. कोकणात पर्यटन वाढले पाहिजे यासाठी येथील रस्त्यांचा विकास महत्त्वाचा आहे म्हणून आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली असून त्यांनी सागरी महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचे आश्वासन दिले असून कोकणातील बंदरे, रेल्वे व महामार्गावर लक्ष केंद्रीत करुन प्राधान्य दिले आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत. खरे तर अर्थसंकल्पातील २५ टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत ज्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा दाखवला त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कोकणातील सावंतवाडी एक्स्प्रेस २४ डब्याची करण्याबाबत व डबलडेकर कोकण रेल्वेकडे देण्याबाबत आपण केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. मासेमारीसाठी केरळच्या धर्तीवर येथे प्रोजेक्ट केले जातील असेही त्यांनी सांगितले.
एस. टी.च्या दोन व्होल्वो आपण पर्यटनासाठी तयार करीत असून ती गाडी प्रथम चिपळूण येथे थांबेल. तेथून ती गणपतीपुळे, आरेवारे, पावस असे करत संपूर्ण समुद्रकिनारे पर्यटकांना दाखवेल. पर्यटन विकासातून चांगले उत्पन्न आपल्याला मिळेल. जर पर्यटक आलेच नाहीत तर विकास होणार कसा? त्यासाठी पर्यटकांना आकर्षित करणारी योजना सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आंबा व काजूला मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. यासाठी कृषी खात्याचे पंचनामे जसेच्या तसे स्वीकारले जात नाहीत असे आपल्या निदर्शनास आले आहे. आपण याची दखल घेतली असून कोकणातील शेतकऱ्यांना चांगली नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्न करु. कोकणात ग्रेनाईट आहे, आर्यनवर्क आहे. काच सामानावर प्रक्रिया करणारा उद्योग किंवा फळ प्रक्रिया उद्योगासारखे प्रकल्प येथे तुलनेने कमी आहेत. त्यावर भर देऊन विकास साधता येईल. केळकर समितीच्या अहवालाबाबत ते म्हणाले, या अहवालाला विदर्भात विरोध आहे. सभागृहात याबाबत चर्चा झाली. काही मंडळी यावर अभ्यास करत आहे. या समितीच्या अहवालातून चुकीचे मुद्दे वगळून जे चांगले आहेत ते स्वीकारले जावेत असे आपले मत असल्याचे त्यांनी सांगितले.
सी वर्ल्ड प्रकल्प झाला पाहिजे. त्यासाठी आपली चर्चा सुरु असून आपण तो १०० टक्के पूर्ण करणार. तसेच सिंधुदुर्गात विमानतळ झाले पाहिजे. केवळ विमानतळ करुन चालणार नाही तर त्याची कनेक्टीव्ही गोव्यापर्यंत असली पाहिजे. यासाठी आपण सिंधुदुर्ग ते गोवा असा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)


नारायण राणे व माझा व्यक्तिगत वाद कधीही नव्हता. त्यांच्या प्रवृत्तीला माझा विरोध होता. एवढ्या मोठ्या नेत्याने कुठे, कधी उभं राहायचं याबाबत मी काय बोलणार? पण त्यांच्या पराभवानंतर मी कधीही त्यांच्याबाबत बोललो नाही. आरोप केले नाहीत. त्यांच्या काळात त्यांच्या परीने त्यांनी विकास केला. माझ्या विकासाचे व्हीजन वेगळे आहे. त्यानुसार मी प्रयत्न करीत आहे, असे ते म्हणाले.


शिवसेना विकासाबाबत बोलते आणि अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करते. याबाबत प्रश्न विचारला असता अणुऊर्जा प्रकल्पाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरु आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणी मी काय बोलणार? त्यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरु आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करुन त्यांनी ही भूमिका घेतली आहे, असे ते यावेळी बोलताना म्हणाले.



कोकणात मोठ्या प्रमाणावर वणवे लागतात. त्यामुळे झाडेझुडपे जळून जातात. आगीत होरपळलेले झाड ५ वर्ष पुन्हा फळ देत नाही तर अनेक झाडे आगीत भस्मसात होतात. यासाठी वणव्याचा नैसर्गिक आपत्तीत समावेश झाला पाहिजे अशी भूमिका आपण मांडली आहे. नैसर्गिक आपत्तीला नुकसान भरपाई देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

Web Title: Mango and cashew corporation funds till July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.